For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पालक म्हणून वागताना...

06:50 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
पालक म्हणून वागताना
Advertisement

पंधरा वर्षाच्या मेघराजची आई भेटायला आली होती. कमालीची अस्वस्थ दिसतच होती. अगदी काळजीच्या स्वरात तिने सांगायला सुरवात केली, ‘मेघराजचे हल्ली काहीतरी बिनसलंय. पूर्वी असा नव्हता हो तो. मोठ्या आवाजात बोलतो, मध्येच चिडचिड करतो, क्षुल्लक कारणांवरुन चिडतो, आजकाल मूड नसणंही फार वाढलंय. सारखा कसला कंटाळा येतो या मुलांना देव जाणे. काही काम सांगितलं तरी अवघड. एक काम करेल तर शपथ..

Advertisement

त्या दिवशी ईशाची आईही काळजीयुक्त स्वरात काही सांगू लागली..ईशाला सोळावे वर्ष लागले आणि मलाच आता टेन्शन आलंय मॅम. खूप बदल जाणवतोय तिच्यात. काहीवेळा एकटी उदास बसेल तर काहीवेळा अगदी प्रेमाचं भरतं आल्यासारखी माझ्या गळ्यात हात टाकुन गाणीही म्हणेल..मूडचा काही नेम नाही. स्वत:ला आरशात किती न्याहाळते नी काय. पूर्वी कसलेही काम सांगितले की पटकन् करायची. आता मात्र कितीवेळा तेचतेच सांगते गं..म्हणून माझ्यावरच वैतागते. हा बदल पाहून मलाच भीती वाटते. टेन्शन येतं वगैरे..

अगदी खरं सांगायचे तर यामध्ये घाबरण्यासारखे काहीच नव्हते. परंतु साधारणपणे 12 ते 19 हा मुला मुलींचा वयाचा कालखंड बऱ्याचदा पालकांची सत्वपरीक्षा पाहणारा असतो असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पौगंडावस्थेच्या या काळात मुलांमध्ये लक्षणीय शारीरिक बदल होतात. काही बदल बाह्यरूपातही दिसतात. त्याचबरोबर मानसिक आणि भावनिक पातळीवरही वेगाने बदल होत असतात. सामान्य भावना त्याच असल्या तरी त्या व्यक्त करण्याची पद्धत, आविष्कार बदललेला असतो. गतिमान वाढीचा आणि परिवर्तनाचा असा हा कालखंड असतो. अंतरस्त्रावी ग्रंथींमुळे शरीरांतर्गत रासायनिक बदल घडत असतात. त्याचा भावनिकतेवर परिणाम होतो. भावनिक अतिवर्धितता हे या वयाचे वैशिष्ट्या म्हणता येईल. विविध बदलांमुळे मनात गोंधळ निर्माण झालेला असतो. काही वेळा स्वभावामध्ये टोकाचा हळवेपणा आलेला असतो, काही वेळा चिंता, भीती, आक्रमकपणा, चिडकेपणा हे वाढलेलं असतं. त्यातच स्व प्रतिमा तयार होत असते पण स्वत:ची ओळख नीट तयार झालेली नसते. धड लहान नाही आणि धड मोठे नाही अशी काहीशी वेगळीच अवस्था असते. लहानांमध्ये मन रमत नाही आणि तशी जबाबदारीची कामे कोणी करू देत नाही. त्यामुळे स्वत:च्या भूमिकेविषयी मनात संदिग्धता असते. नेमकं कसं वागायचं हे कळत नसतं. त्यातच शारीरिक बदल झपाट्याने होतात. स्वत:चे शरीर वेगळंच भासू लागतं. याच काळात लैंगिक प्रेरणा, जाणिवा निर्माण होऊ लागतात. लैंगिक आकर्षण जाणवायला लागतं. हे सारे बदल एवढ्या झपाट्याने घडतात की या वयातील मुले गोंधळून जातात. मुलगा किंवा मुलगी एकदम असे काय वागतात हा प्रश्न पालकांना पडू लागतो. या वळणावरती पालकांनी अस्वस्थ न होता समंजसपणा, सुज्ञपणा, सबुरी ठेवत आपले भाषिक कौशल्य उपयोगात आणले तर हा वादळी वयाचा कालखंड व्यवस्थित पार पडू शकतो. अन्यथा मुलांमध्ये नकारात्मक व चुकीची आत्मप्रतिमा तयार होण्याचा धोका संभवतो अथवा मुले काही चुकीच्या गोष्टींकडे वळण्याची देखील शक्यता असते. आपल्याला सतत सूचना मिळत आहेत किंवा प्रेमाची, इतर लहान सहान गोष्टींची गरज पूर्ण होत नाही अशी तीव्र भावना मुलांच्या मनात निर्माण झाली तर ते गरजांची पूर्तता करणारी माध्यम बाहेर शोधतात आणि हळूहळू सारे अवघड होऊन बसते. मुले घरापासून दुरावतात. हे सविस्तर मांडण्या मागचे कारण म्हणजे या वयातील मुलांचे सातत्याने समोर येणारे प्रश्न आणि पालकांची अस्वस्थता, चिंता.

Advertisement

सजगतेने यावर विचार केला तर सुवर्ण मध्य काढता येतो. अनेकदा असे होते की मुले ज्या वेळेला या वयाच्या कालखंडामध्ये येतात त्यावेळी पालक आपले लक्ष नाही, पालक म्हणून आपण चुकू नये यासाठी खूप लक्ष ठेवून असतात. मला भेटायला आलेला निहार म्हणाला, मॅडम मला आता माझ्या पालकांचीच काळजी वाटू लागली आहे. माझे पालक सतत माझ्यावर वॉच ठेऊनच असतात. मी टीनएजर झालो आणि ते ‘सीआयडी’च्या भूमिकेतच शिरले आहेत. जरा मोकळा श्वास घेऊ देत नाहीत. ह्याच्याबरोबर जाऊ नको..तो असाच आहे..आता कुणाशी बोलत होतास..का बोलत होतास? काय पहातोयस..सतत संशयी नजर..मला तर सतत अशी जाणीव होते की मी स्पॉटलाईटखाली आहे आणि सतत मला कुणीतरी न्याहाळत आहे. त्यावेळी निहारची अस्वस्थता, राग, बोलतानाही जाणवत होता.

पालकांनीही हे लक्षात घ्यायला हवे की अगदी बेफिकीर असणे जितके धोकादायक तितकेच सतत मुलांच्या अवतीभोवती त्यांना न्याहाळत राहणे, सूचनांचा भडिमार करणेही त्रासदायकच.

सुजाण आणि स्मार्ट पालकत्व हे आव्हान आहे. पाल्य आणि पालक यामधील आपलेपणाच्या धाग्याची वीण सजगतेने घट्ट ठेवणं आवश्यक आहे. आज अनेक समस्या सातत्याने आपल्या समोर येताना दिसतात. त्यामुळे पालक म्हणून मुलांची काळजी वाटणे हे अगदी स्वाभाविक आहे परंतु धास्तावून सतत समीक्षकाच्या भूमिकेत राहणं पालकांनीही टाळायला हवे. हे वय उमलण्याचे असते. जसे कळी उमलताना अजिबात पाणी न देणं हे धोकादायक तसेच ती नीट उमलेल ना, फुलेल ना, या भीतीमधून साशंकतेने प्रमाणाबाहेर पाणी घालणेही धोकादायक आहे ही बाब लक्षात घ्यायला हवी. योग्य प्रमाणात ते दिल्यास कळीचे उमलणे मोहक दिसते आणि आनंददायी असते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मूल जसे मोठे व्हायला लागते तसे पालकांपासून ते स्वतंत्र होऊ बघते. तसं करताना मुलं थोडी बंडखोरी करतात परंतु पालक मात्र त्याला अजून खूप लहान समजून त्याच्या आयुष्याचा निर्णयाचा रिमोट स्वत:कडे ठेवून बघतात आणि इथेच गफलत होते. आपल्याबद्दल पालकांना विश्वास वाटत नाही असं मुलांना वाटू लागतं आणि एक प्रकारची अढी निर्माण व्हायला सुरुवात होते.

पालकांच्या साध्या साध्या सूचनाही मग नकोशा वाटू लागतात. टीनएजचा हा कालखंड आव्हानात्मक असतो खरा परंतु ही ‘फेज’ आहे हेही आपण लक्षात घ्यायला हवे. अर्थात म्हणून कशाही वागण्याला परवानगी आहे असा त्याचा अर्थ नाही. तरीही हे लक्षात घ्यायला हवे की, या काळात मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची बांधणी थोडी विस्कळीत झालेली असते. विचारांची, मूल्यांची पडझड सुरू असते, नवीन विचार आकाराला येत असतात, काही वेळा काय बरोबर, काय चूक हे कळत नसतं, त्यातच झपाट्याने शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होत असतात. त्यामुळे मुलांच्यात थोडी अस्वस्थता, काही वेळेला वागण्या बोलण्यात सुसंगती किंवा निश्चितपणा नसतो. ही वस्तुस्थिती आपण पालक म्हणून समजून घेतली तर विचारपूर्वक मुलांसोबत संवाद साधणे आपल्याला सोपे होईल. आपले विचार किंवा मुलाविषयीची काळजी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य, संवाद कौशल्य आत्मसात केल्यास बऱ्याच गोष्टी सोप्या होतील हे मात्र निश्चित.

-अॅड. सुमेधा संजिव देसाई

Advertisement
Tags :

.