अदानी विल्मरकडून कोहीनूरचे अधिग्रहण
खरेदी व्यवहाराची रक्कम गुलदस्त्यात : कंपनीचे बाजारमूल्य वाढणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी अदानी विल्मर लिमिटेड यांनी नुकतेच पॅकेजड फुडस ब्रँड कोहीनूरचे अधिग्रहण केले आहे. याबाबतची माहिती अदानी विल्मर यांनी शेअर बाजाराला दिली आहे.
कोहीनूर ही अमेरिकेतील दिग्गज मॅककॉर्मिकची कंपनी आहे. या व्यवहारात प्रीमीयम बासमती तांदळासह चारमिनार आणि ट्रॉफीसारख्या अम्बेला बँडचा समावेश आहे. ज्यांचे बाजारमूल्य अंदाजे 115 कोटी रुपये होते. परंतु सदरचा खरेदीचा व्यवहार किती रक्कमेचा झाला आहे याबाबत अदानी विल्मरकडून खुलासा करण्यात आलेला नाही. सोमवारी अदानी विल्मरचे समभाग 3.70 टक्के घटून 751 रुपयांवर बंद झाले होते. कंपनीला मार्चअखेरच्या तिमाहीत मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
गौतम अदानी यांची एफएमसीजी कंपनी आगामी काळात आपल्या व्यवसायात अधिक मजबुती आणणार आहे. अदानी विल्मर ही भारतात पहिल्यापासूनच सर्वात मोठी खाद्य तेल आयातक कंपनी आहे. आता कोहीनूर ब्रँडेड तांदळाच्या स्पर्धेत तिसरे स्थान कंपनी काबीज करणार आहे . तीनही ब्रँडस् वर्षाला 300 कोटी रुपयांची विकी करते आहे. यासोबत आता कंपनीचे बाजारमूल्य वाढण्यास मदत होणार आहे.