नेहा हत्येतील आरोपी सीआयडीच्या ताब्यात
हत्या झालेल्या हुबळीतील महाविद्यालय आवारात नेऊन झडती
प्रतिनिधी/ बेंगळूर
हुबळीत नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीची हत्या करणारा आरोपी फयाज याला सीआयडी अधिकाऱ्यांनी बुधवारी सहा दिवसांसाठी आपल्या ताब्यात घेतले आहे. धारवाड जिल्हा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर फयाजला बीव्हीबी महाविद्यालय आवारात आणून हत्या झालेल्या परिसराची झडती घेतली. दरम्यान, पाच दिवस आधी फयाजने नेहाच्या हत्येसाठी धारवाडमध्ये चाकू खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
नेहाची हत्या झाल्यानंतर विविध संघटनांनी राज्यभरात जोरदार आंदोलन केले. भाजपकडूनही सरकारवर टीका झाल्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्याची घोषणा करण्यात आली. सीआयडीने मंगळवारपासून तपास हाती घेतला. तत्पूर्वी आरोपी फयाजला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. बुधवारी त्याला सीआयडीने आपल्या ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
वरिष्ठ पोलीस अधिकारी वेंकटेश यांच्या नेतृत्त्वाखालील पथक या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला आपल्या ताब्यात घेण्यासाठी धारवाडच्या प्रथम जेएमएफसी न्यायालयात अर्ज केला होता. अर्जाची दखल घेत न्यायालयाने फयाजला सहा दिवसांसाठी सीआयडीच्या ताब्यात दिले.
सीआयडीच्या तपासातून न्याय मिळेल : सुरजेवाला
राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी हुबळीनजीकच्या बिडनाळ येथे नेहाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नेहाच्या हत्येवरून कोणीही राजकारण करू नये. सीआयडीच्या तपासातून न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. आरोपीला फाशी व्हावी, असा आमचा आग्रह आहे. अलीकडेच विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. 90 दिवसांत न्याय मिळण्याचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.