कार फसवणूक प्रकरणातील आरोपीला अटक
मार्केट पोलिसांची कारवाई : 21 लाखाच्या चार कार जप्त
बेळगाव : अनेकांना विश्वासात घेऊन त्यांची कार घेऊन परत न करणाऱ्या भामट्याला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. महेश जगदीश पाटील (वय 32, राहणार मूळचा बेनचिनमर्डी ता. बैलहोंगल, सध्या रा. ज्योतीनगर कंग्राळी के. एच.) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळून विविध कंपन्यांच्या चार कार जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी महेश जगदीश पाटील याने 7 फेब्रुवारी रोजी येथील संगोळ्ळी रायण्णा सर्कलमध्ये मोहम्मदइजाज अब्दुलमुनीम सनदी यांच्याशी ओळख वाढून त्यांच्या मालकीची महिंद्रा एक्सयुव्ही कार परगावी नेली. नंतर मोबाईल स्वीच ऑफ केला. कार परत न करता फसवणूक करण्यात आली. त्यामुळे मोहम्मदइजाज यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती.
सदर प्रकरणासह महेशविरोधात अशाच घटनेसंबंधी दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे बेळगाव शहर पोलीस आयुक्त, उपायुक्त तसेच गुन्हे विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली महांतेश धामन्नावर यांच्या नेतृत्वाखाली मार्केट पोलीस स्थानकाचे पीएसआय शशीकुमार एस. कुरळे आणि गुन्हे विभागाच्या पोलिसांचे पथक नेमण्यात आले. या पथकाने तपास करत महेश जगदीश पाटील याला अटक केली. त्याच्याकडून महिंद्रा एक्सयुव्ही 500 कार, टाटा झेस्ट एक्सव्ही, स्विफ्ट डिझायर, होंडा जाझ अशा एकूण 21,50,000 रु. किमतीच्या कार जप्त केल्या आहेत. कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महांतेश धामन्नावर, पीएसआय शशीकुमार कुरळे, एएसआय शंकर शिंदे तसेच एल. एस. कडोलकर, आय. ए. पाटील, नवीनकुमार ए. बी., सुरेश कांबळे, एस. बी. खानापुरे, रमेश अक्की यांचे अभिनंदन केले.