पीआयटी-एनडीपीएस कायद्यांतर्गत आरोपी अंधासलीमला अटक
हिंडलगा येथील कारागृहात ठेवणार बंदिस्त
बेळगाव : आरोपी सलीम उर्फ अंधासलीम कमरूद्दीन सौदागर रा. बागवान गल्ली याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत 12 गुन्हे दाखल आहेत. इतकेच नव्हे तर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, घरफोडी आणि साक्षीदारांना धमकावणे इत्यादी गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग आहे. याशिवाय तो आंतरराज्य गुन्हेगार असून गोवा आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये गुन्हेगारी कारवायांमध्येदेखील सहभाग आहे. सदर आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्याच्याविरुद्ध पीआयटी-एनडीपीएस कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कलम 3 (1) अंतर्गत अटक वॉरंट जारी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार अटक वॉरंट जारी झाले असून आरोपीला हिंडलगा कारागृहात बंदिस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही कारवाई म्हणजे अंमलीपदार्थ गुन्हेगारांसाठी गुंडा कायद्याच्या समतुल्य असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
आरोपी अंधासलीम याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत 12, मालमत्तेच्या वादातून 21, खून प्रकरणी 1, खुनाचा प्रयत्न 2, साक्षीदाराला धमकावल्या प्रकरणी 1 असे एकूण 37 गुन्हे दाखल आहेत. 5 प्रकरणात शिक्षा झाली असून 26 प्रकरणामध्ये तो निर्दोष झाला आहे. सदर आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने त्याच्याविरुद्ध पीआयटी-एनडीपीएस कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. नियमानुसार कलम 3 (1) अंतर्गत अटक वॉरंट जारी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार पीआयटी-एनडीपीएस-1988 (सुधारणा) च्या कलम 3 (1) नुसार आणि कर्नाटक सरकारच्या आदेश क्र. एचडी/01 2019 दि. 21 फेब्रुवारी 2023 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांनी आरोपी अंधासलीम याला 27 ऑक्टोबर 2025 रोजी अटक आदेश क्र. एलअॅण्डओ/136/2025 द्वारे अटक वॉरंट जारी केले आहे. त्यानुसार आरोपीला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बेळगाव शहरात पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यापासूनचा पीआयटी-एनडीपीएस कायदा 1988 अंतर्गत जारी झालेला हा पहिलाच आदेश आहे. तसेच हा आदेश गुंडा कायद्याच्या समतुल्य असल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.