गृहलक्ष्मीची रक्कम जमा होण्यास प्रारंभ
महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर मंगळवारपासून रक्कम जमा होण्यास प्रारंभ झाला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. गृहलक्ष्मी ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील महिला प्रमुखांना 2000 रुपये देण्याची योजना आहे. गेल्यावषीच्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रमुख आश्वासनांपैकी एक असलेली ही योजना 30 ऑगस्ट 2023 रोजी म्हैसूरमध्ये सुरू करण्यात आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रातील एनडीए सरकारकडून कर्नाटक राज्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आणि भाजप-निजद पदयात्रेच्या विरोधात उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली मंड्या येथे झालेल्या जनआंदोलनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्या बोलत होत्या. दरम्यान, मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात भाजप आणि निजदकडून होत असलेल्या अपप्रचाराचे खंडन करण्यात आले.
गेल्या दोन महिन्यांपासून गृहलक्ष्मी योजनेचे पैसे खात्यावर जमा नसल्याची तक्रार काही महिलांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे आम्ही महिलांच्या बँक खात्यात जून आणि जुलै महिन्याचे पैसे जमा करू शकलो नाही. मंगळवारपासून पैसे जमा होण्यास प्रारंभ झाला असून काँग्रेस पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण करत आहोत, असेही मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या. यावेळी मंत्री के. एच. मुनियप्पा, बोसराजू, चलुवरायस्वामी, कृष्णभैरेगौडा, डी. सुधाकर, संतोष लाड, शरणप्रकाश पाटील, रामलिंगा रे•ाr, प्रियांक खर्गे, भैरती सुरेश, माजी मंत्री रमानाथ राय आदी उपस्थित होते.