लेखा स्थायी समितीची गुरुवारी बैठक
खर्चाच्या नियोजनाबाबत होणार चर्चा
बेळगाव : महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक पार पडल्यानंतर आता लेखा स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता ही बैठक होणार असून बैठकीमध्ये 2023-24 वर्षाच्या जमा-खर्चाबाबत चर्चा होणार आहे. लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षा रेश्मा कामकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. महापालिकेवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे आता तातडीने ही बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीमध्ये खर्चाचे नियोजन कशाप्रकारे केले जाणार आहे, हे ठरविण्यात येणार आहे. लेखा स्थायी समितीच्या या निर्णयाकडे आता साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. 20 कोटी रुपये महानगरपालिकेला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे त्याच्या नियोजनासाठी लेखा विभाग प्रयत्न करत आहे. याचबरोबर आता खर्चाचेही नियोजन करावे लागणार आहे. मासिक खर्च कशाप्रकारे करायचा, याविषयीही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.