न्यायालयाच्या आदेशानुसार शहापूरची ‘ती’ जागा मूळ मालकाला
अखेर मनपाकडून न्यायालयाच्या आदेशाचे पालन
प्रतिनिधी/ बेळगाव
न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर शहापूर महात्मा फुले रोड येथील बँक ऑफ इंडियापासून जुन्या पी. बी. रोडवर असलेली ती जागा मूळ मालकाच्या कब्जात शनिवारी देण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्तासह महानगरपालिका व स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते. धारवाड उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन महानगरपालिकेने केले असून आता सोमवारी जागा दिल्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करून त्या खटल्यातून बचाव करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहे.
महात्मा फुले रोड कॉर्नरपासून जुन्या पी. बी. रोडपर्यंत रस्ता घाईगडबडीत करण्यात आला. त्या रस्त्यासाठी बाळासाहेब पाटील यांची 21.65 गुंठे जमीन घेण्यात आली होती. जमीन घेतल्यानंतर योग्य ती नुकसानभरपाई त्यांना देण्यात आली नाही. 2019 मध्ये रस्ता घाईगडबडीत करण्यात आला. बाळासाहेब पाटील यांच्यासह इतर काहीजणांची जागा घेण्यात आली होती. मात्र ही जागा घेताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. परिणामी आता महानगरपालिका अडचणीत आली. महत्त्वाचे म्हणजे महानगरपालिकेवर मोठे आर्थिक संकट आले. त्यामुळे महानगरपालिकेने रस्त्यासाठी घेतलेली जागा परत देण्याचा निर्णय घेतला.
उच्च न्यायालयाने जागा मालकाला 20 कोटी भरपाई देण्याचा आदेश बजावला होता. मात्र ती नुकसानभरपाई देण्यासाठी टाळाटाळ झाली होती. त्यामुळे जागा मालकाने महानगरपालिकेविरोधात अवमान याचिका दाखल केली. त्या याचिकेमुळे महानगरपालिका चांगलीच अडचणीत आली. एक तर जागा मालकाला 20 कोटी द्या किंवा जागा मूळ मालकाला परत करा, असा आदेश बजावला होता. मंगळवार दि. 17 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधीश दीक्षित यांनी हा आदेश दिला होता. यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले होते. तुम्ही आतापर्यंत न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करत आहात, मात्र त्याची कार्यवाही होत नाही, असेदेखील न्यायालयाने सुनावले होते. जर न्यायालयाचा आदेश पाळत नसाल तर तुमच्याकडून दंड वसूल का करू नये? असे देखील म्हटले होते.
त्यानंतर महानगरपालिकेच्या वकिलांनी आम्ही संबंधित मालकाला जागा देऊ, असे न्यायालयात सांगितले. त्यावेळी न्यायाधीशांनी यापूर्वी तुम्ही पैसे देतो अशी याचिका दाखल केला होता. त्यामुळे न्यायालयाचा वेळ वाया घालत आहात, तेव्हा प्रथम तुम्ही ती जागा सर्व्हे करून मूळ मालकाला द्यावी, असे सुनावले. त्यामुळे तातडीने प्रांताधिकारी, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या जागेचा सर्व्हे केला. त्यानंतर शनिवारी सकाळीच त्या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी श्रवण नाईक, स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक सहिदा आफ्रिनबानू बळ्ळारी यांच्यासह इतर अधिकारी दाखल झाले.
मनपाच्या भूमिकेमुळे रस्ता झाला बंद
सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी जागेचे आरेखन करून ती जागा बाळासाहेब पाटील यांना दिली. यावेळी या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले. आता ती जागा बाळासाहेब पाटील यांनी कब्जात घेतली आहे. मात्र याठिकाणी असलेल्या रस्त्याची खोदाई करावी लागणार आहे. मनपाच्या या भूमिकेमुळे रस्ता मात्र बंद झाला आहे. यावेळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.