महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अपघातांबाबत ‘भिवपाची गरज आसाच’!

12:53 PM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन: रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन : सर्वत्र लावणार नाईट व्हिजन कॅमेरे

Advertisement

पणजी : कोविड काळात आपणच लोकांना सांगत होतो की ‘भिवपाची गरज ना’ मात्र आता राज्यात बेशिस्त आणि निष्कळजीपणाने वाहने चालवताना पाहिल्यास  भिवपाची गरज आसा’ असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. अपघातांची संख्या वाढत आहे. दर दिवसाला किमान 40 ते 50 अपघात होतात आणि एकाचा तरी त्यात मृत्यू होतो. 10 ते 15 लोक गंभीर जखमी होतात. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. सरकार वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. मात्र ही जबाबदारी केवळ सरकारची नव्हे, तर प्रत्येकाने त्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. वाहतूक खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 13 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, वाहतूक खात्याचे संचालक प्रविमल अभिषेक, वाहतूक पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर, मोहिमेचे प्रमुख संदीप देसाई, फादर अँथनी डिसोझा व्यासपीठावर उपस्थित होते.

Advertisement

बसचालकांची होणार अल्कोमीटर तपासणी

गंभीर अपघातांमध्ये 80 टक्के वाहनचालक दारू पिऊन असल्याचे दिसून आले आहे. सार्वजनिक वाहतूक करणारे बसचालक देखील दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे आढळले आहे. काही दिवसांपूर्वी आपण स्वत: काणकोणमध्ये असा प्रकार पाहिला होता. त्या अपघातात तीन प्रवाशांचा जीव गेला होता तर अनेकजण जखमी झाले होते. यासाठी वाहतूक खात्यातर्फे राज्यात तसेच राज्याबाहेर बस नेणाऱ्या बसचालकांची मद्य तपासणी करणे आवश्यक आहे. लवकरच याबाबत विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वत्र लावणार नाईट व्हिजन कॅमेरे

गोव्याची ओळख ही अपघातग्रस्त राज्य म्हणून बनत आहे. राज्यात होणाऱ्या अधिकाधिक अपघातांची प्रमुख कारणे म्हणजे अल्पवयीन मुले वाहन चालवतात आणि त्यांचे पालकच त्यांना प्रोत्साहन देतात, असे दिसून आले आहे. एखाद्या अपघातात बळी पडल्यावर त्यांचे डोळे उघडतात मात्र तोपर्यंत वेळ गेलेली असते. असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले. दुसरे प्रमुख कारण म्हणजे गोव्यात येणारे पर्यटक हे वाहन चालविण्याचे कोणतेही ज्ञान नसताना रेंट-ए-कार भाड्याने घेतात आणि जीवाचा गोवा करण्यासाठी कार चालवतात आणि अपघाताला कारणीभूत ठरतात. अशा पर्यटकांवर आणि अल्पवयीन मुलांवर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकार संपूर्ण गोव्यात नाईट व्हिजन कॅमेरे बसवण्याचा विचार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. काल सोमवारपासून सुऊ झालेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहात राज्यभरात गाव पातळीवर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल. वाहतूक संचालक प्रविमल अभिषेक यांनी स्वागतपर भाषण केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुऊवात करण्यात आली. डॉन बॉस्को हायस्कूलच्या सभृहात झालेल्या कार्यक्रमात वाहतूक सुरक्षा या विषयावर चित्रप्रदर्शन तसेच शॉट फिल्म स्पर्धा आयोजित करण्यात आले होती. संदीप देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर त्यांनीच आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article