अपघात होणारच.. अतिक्रमण वाढणारच..
सांगली :
सांगलीत गेल्या तीन दिवसांपासून सलग अपघात होत आहेत. या अपघातात सांगलीतील दोन महिलांचा बळी गेला आहे. पण या अपघाताला कारणीभूत असणाऱ्या अतिक्रमणाबाबत मात्र राजकीय पुढारी आणि पदाधिकारी चकार शब्द काढण्यास तयार नाहीत. महापालिकेचे प्रशासनानेही अतिक्रमण काढण्याची मोहिम बांबवून ठेवली आहे. कारण पालकमंत्र्यांच्या आदेशामुळे ही अतिक्रमण काढण्याची मोहिम थांबवण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीत अपघात होणारच... अतिक्रमण वाढणारच.... आणि सांगलीकर फक्त सोशल मिडियातून चर्चा करणार त्यामुळे हे अपघात काही थांबले जाणार नाहीत अशी सध्याची स्थिती आहे.
- दोन बळी गेले, दोघेजण गंभीर जखमी
सांगलीत सलग दोन दिवस जे अपघात झाले त्यामध्ये दोन महिलांना बळी गेला आहे. तर इतर दोन अपघातात दोघे गंभीर जखमी आहेत. या अपघातासाठी अनेक कारणे आहेत. पण महत्वाचे कारण हे अतिक्रमण आहे. पण या अतिक्रमणाबाबत कोणीच काहीही बोलत नाही. रस्ते हे वाहतुकीसाठी आहेत. की अतिक्रमणासाठी असा सवाल आता सांगलीकर करू लागले आहेत. कारण सांगलीतील असा कोणताही रस्ता नाही त्याठिकाणी अतिक्रमण झाले नाही. वाहतुकीसाठी असणारे रस्ते हे अतिक्रमित झाले आहेत. हे अतिक्रमण काढण्याची तीव्र भूमिका महापालिकेने आयुक्त सत्यम गांधी यांनी घेतली होती.
पण याला मात्र सत्ताधारी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र विरोध केला आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यावर आयुक्त आणि त्यांची खडाजंगी झाली आणि त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही अतिक्रमण काढण्याची मोहिम थांगवण्याचा तोंडी आदेश आयुक्तांना दिला. त्यामुळे आयुक्तांनी अतिक्रमण रस्त्याकडे पाहणे सोडून दिले आहे.
- अतिक्रमणाबाबत सांगलीकर फक्त सोशल मिडियातून व्यक्त
सांगलीत झालेल्या या अपघाताबाबत जागरूक सांगलीकर चांगलेच चिडले आहेत. त्यांचा राग ते सोशल मिडियातून काकरा आहेत. त्यांच्यानुसार अतिक्रमण तात्काळ काढले पाहिजे पण हे अतिक्रमण काढणाऱ्यांचे हातच जर शासनाने बांधून ठेवले आहेत. तर त्या अधिकाऱ्यांनाही काय बोलणार असा सवाल असा नागरिकांच्याकडुन व्यक्त करण्यात येत आहेत.
आयुक्त गांधी यांनी अतिक्रमणे काढण्याची हाती घेतलेली मोहिम जर यशस्वी झाली असती तर सांगलीतील दोन बळी निश्चितपणे गेले नसते. सांगलीतील मुख्य बाजारपेठेत तर वाहन चालवणे सोडाच सामान्य माणसाला सहजपणे चालता येत नाही इतके हे रस्ते अतिक्रमित आहेत. याबाबत अनेकवेळा महापालिकेला दुकानदारांनी विविध संघटनांनी निवेदन दिली आहेत. पण ते निवेदन स्वीकारण्याच्या पलिकडे महापालिकेने कोणतेच काम केले नाही.
- देशातील प्रश्नावर आंदोलन करणारे विरोधक सांगलीच्या प्रश्नावर मूग गिळून गप्प
देशात कोठेही खुट्ट झाले, काहीही झाले की त्याला तात्काळ विरोध करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर पुरोगामी पक्ष तात्काळ आंदोलने घेतात. पण सांगलीतील अतिक्रमणाच्या ज्वलंत प्रश्नावर विरोधक मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत, त्यांना सांगलीच्या प्रश्नाची जाणच नाही असे यातून दिसून येते. याचाच अर्थ विरोधकांनाही सांगलीबद्दल कोणतेही प्रेम राहिले नाही. ते फक्त पक्षांने दिलेला अजेंडा पाळतात आणि आंदोलने करतात असेच म्हणावे लागेल.
- आमदार सुधीर गाडगीळ यांनी याबाबत अवाक्षरही काढले नाही...
सांगलीच्या जनतेच्या हितासाठी आपली उमेदवारी आहे. सांगलीकर जनतेच्या विकासासाठी आम्ही निवडून आलो आहोत असे सांगणाऱ्या आमदार सुधीर गाडगीळ यांनी अतिक्रमणांच्या प्रश्नावर आवाज उठविला नाही. किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही यावर अवाक्षर काढले नाही. जतचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील अतिक्रमण मोहिमेविरूब्द आवाज उठविला. त्यावेळी सांगलीच्या आमदारांनी थोडातरी याला विरोध करण्याची भूमिका प्यायला पाहिजे होती. तसेच प्रशासनाच्या पाठीशी राहणे गरजेचे होते. पण ती भूमिका आमदार सुधीर गाडगीळ यांनी घेतली नाही. पालकमंत्र्यांनीही मागचापुढचा विचार न करता या मोहिमेला थांबवण्याचे तोंडी आदेश दिले. याचाच अर्थ भाजपाला या प्रश्नाशी काही देणेघेणे नाही.