करजगीतील युवकाचा अपघाती मृत्यू
प्रतिनिधी/ खानापूर
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झालेल्या अपघातात खानापूर तालुक्यातील करजगी येथील युवक पवन रमेश बरगावकर (वय 22) याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी घडला. कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. पवन बरगावकर हा कोरेगाव परिसरात फॅब्रिकेशनचे काम करीत होता. तो काही कामानिमित्त करजगी येथे आपल्या गावाकडे आला होता. पवन व त्याचा मित्र हे दोघे करजगी येथून शुक्रवारी पहाटे कोरेगावकडे जाण्यासाठी निघाले. कोरेगाव येथे पोहोचले असताना मागून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट कारने धडक दिल्याने पवन हा रस्त्यावर मधोमध उडून पडला. त्याचवेळी बोलेरो गुड्स वाहतूक करणारा टेम्पो त्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने कोरेगाव रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र
डॉक्टरांनी मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. करजगी येथे शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पवनच्या पश्चात आई-वडील आहेत. तो एकुलता एक असल्याने त्याच्यावरच कुटुंबाची धुरा होती.