For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रकला ओव्हरटेक करताना अपघात

06:02 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
ट्रकला ओव्हरटेक  करताना  अपघात
Advertisement

गिरी पंचायत क्षेत्रातील नामोशी येथील शाळेजवळ शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालक तरुण ठार झाला आहे. विदेश विनोद पोळे (23, रा. पोडवाळ- खोर्जुवे) असे या तरुणाचे नाव आहे. हॉटेलहून घरी परतताना हा अपघात झाला.

Advertisement

विदेश पोळे हा जीए-0-एजी-1081 क्रमांकाच्या दुचाकीने पर्राहून ग्रीनपार्कच्या दिशेने निघाला होता. त्याच्याच समोरून जीए-03-व्ही-0904 क्रमांकाचा ट्रक निघाला होता. नामोशी येथील शाळेजवळील जंक्शनवर विदेशने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात त्याचा तोल गेला अन् तो दुचाकीसह ट्रकच्या चाकाखाली पडून चिरडला गेला. शनिवारी सकाळी 10.10 वाजता झालेल्या या अपघातात विदेश जागीच ठार झाला.

अपघाताची माहिती मिळताच म्हापसा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक दिनेश मुखिया आणि हवालदार शिवाजी शेटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करून त्यांनी विदेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळात पाठवून दिला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक रघुनाथ पवार (रा. थिवी, मूळ रा. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे.

Advertisement

वेर्णात दुचाकी-सायकल अपघात

सेरावली-वेर्णा येथे दुचाकी आणि सायकलच्या अपघातात सायकलस्वार ठार झाला. सायकलस्वाराचे नाव आंतानिओ मास्कारेन्हस (वय 73, रा. शिर्ली) असे  आहे. याप्रकरणी दुचाकी चालक मोहम्मद खान (रा. चिंबल) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

नईबाग-पोरस्कडे येथे ट्रक दुभाजकावर चढला

नईबाग पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्गावर विजेची सोय तसेच दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्यावेळी महामार्गाचा अंदाज येत नाही. यामुळे येथे वारंवार अपघात घडतात. शनिवारी रात्री ट्रक चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने जीए-04-टी-3883 हा ट्रक दुभाजकावर चढून अडकला.  यावेळी दुसरे वाहन आले नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

ऩईबाग पोरस्कडे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात झाले तरीही सरकारी यंत्रणा सुस्त आहे. होणारे अपघात टाळण्यासाठी नईबाग पोरस्कडे येथील जंक्शनवर आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी  माजी सरपंच निशा हळदणकर यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.