For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपघात नव्हे घातपात; सहा जण आत

11:19 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
अपघात नव्हे घातपात  सहा जण आत
Advertisement

फार्मासिस्टच्या मृत्यूला कलाटणी, अनैतिक संबंधातून दहा लाखांची सुपारी, पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Advertisement

बेळगाव : सेवानिवृत्तीच्या ठिक एक दिवस आधी भरधाव कारच्या ठोकरीने मृत्युमुखी पडलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधील चिफ डेप्युटी फार्मासिस्टच्या मृत्यू प्रकरणाला कलाटणी मिळाली असून त्याचा मृत्यू अपघातात नाही तर सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. आता अपघात प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस व एपीएमसी पोलिसांच्या पथकाने हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आणले आहे. दहा लाखांची सुपारी देऊन या अधिकाऱ्याला निवृत्तीच्या एक दिवस आधी कारने चिरडण्यात आले. यासाठी दहा लाखांची सुपारी घेतल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. वाहतूक पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे खून करून अपघात भासविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवार दि. 30 मे रोजी सकाळी विरुपाक्षप्पा कोट्य्राप्पा हर्लापूर (वय 60) रा. धारवाड या सिव्हिल हॉस्पिटलमधील चिफ डेप्युटी फार्मासिस्टचा कारच्या ठोकरीने मृत्यू झाला होता. वैद्यकीय विभागाच्या प्रवेशद्वाराजवळच हा अपघात घडला होता. कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली होती.

अपघातानंतर कारचालकाने कारसह तेथून पलायन केले होते. सीसीटीव्ही फुटेजवरून अपघातग्रस्त कारचा शोध घेताना वाहतूक उत्तर विभाग पोलिसांना या कारसंबंधीची माहिती मिळाली. गॅरेजमध्ये ती कार उभी करण्यात आली होती. पोलिसांनी त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू केला असता विरुपाक्षप्पाचा मृत्यू कार अपघातात नाही तर सुपारी देऊन त्याचा खून केल्याचे उघडकीस आले. मंगळवार दि. 4 जून रोजी रात्री वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एपीएमसी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन व त्यांच्या सहकाऱ्यांनी या खळबळजनक खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला आहे.

Advertisement

अनैतिक संबंधातून सुपारी देऊन विरुपाक्षप्पाचा काटा काढल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. विरुपाक्षप्पाच्या नात्यातील बसवराज भगवती याने ही सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून सुपारीची रक्कमही देण्यात आली होती. त्यामुळेच कारने विरुपाक्षप्पाला चिरडण्यात आले आहे. 31 मे रोजी प्रदीर्घ शासकीय सेवेतून विरुपाक्षप्पा निवृत्त होणार होता. आदल्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांना भेटून सिव्हिल हॉस्पिटलमधून बाहेर पडताना त्याला कारने ठोकरण्यात आले आहे. पाळत ठेवून हे कृत्य करण्यात आले आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन, उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बसवराज मिटगार, बसवराज नरगुंद, विलास बाबानगर, के. व्ही. चरलिंगमठ, महेश गोविंद पुजारी, नामदेव लमाणी आदींचा समावेश असलेल्या पथकाने या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. बुधवारी सायंकाळी सर्व सहा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

बेळगाव शहर व तालुक्यातील सहा जण अटकेत

चिफ डेप्युटी फार्मासिस्ट विरुपाक्षप्पाच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व सहा जण बेळगाव शहर व तालुक्यातील राहणारे आहेत. बसवराज यल्लाप्पा भगवती (वय 50) मूळचा रा. धारवाड, सध्या रा. भारत कॉलनी, एम. एम. एक्स्टेंशन, प्रकाश रामाप्पा राठोड (वय 41) रा. कंग्राळी खुर्द, सचिन चंद्रकांत पाटील (वय 40), रवी बसू कुंबरगी (वय 28), महेश सिदराम सुंकद (वय 24), रामू लगमा वंटमुरी (वय 28) सर्व रा. कंग्राळी बुद्रुक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बसवराज हा खून झालेल्या विरुपाक्षप्पाचा नातेवाईक आहे. या प्रकरणातील आणखी काही जण फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

वर्षभरापासून प्रयत्न....

विरुपाक्षप्पाचा काटा काढण्यासाठी गेल्या एक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. मात्र, सुदैवाने एक वर्षापूर्वीच झालेल्या हल्ल्यात तो बचावला होता. त्यावेळीही कारने धडकून त्याला संपवण्याचा प्रयत्न झाला होता. 15 जून 2023 रोजी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातच विरुपाक्षप्पाला कारने ठोकरले होते. या घटनेत तो किरकोळ जखमी झाला होता. त्याचवेळी वाहतूक पोलीस स्थानकात अपघाताची नोंदही करण्यात आली होती. मात्र, हा प्रकारही अपघात नसून खुनाचाच प्रयत्न होता, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

Advertisement
Tags :

.