जमावामध्ये कार घुसल्याने अपघात, युवतीचा मृत्यू : अन्य 8 जण जखमी
कारवार : मद्यपी कारचालकाच्या बेजबाबदारपणामुळे यात्रेच्यानिमित्ताने जमा झालेल्या श्रद्धाळूमध्ये कार घुसल्याने नऊ श्रद्धाळू जखमी झाले. यापैकी एका युवतीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री सिद्धापूर, चंद्रगुती रस्त्यावरील बालिकोप्पद येथे घडली. गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव दीपा रामागौडा (वय 21, रा. कस्तुरु-कलकोप्प, ता. सिद्धापूर) असे आहे. मद्यपी कार चालकाचे नाव रोशन फर्नांडिस आहे. या प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, कारवार जिल्ह्यातील सिद्धापूर चंद्रगुती रस्त्यावरील बालीकोप्पद येथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने श्री अय्यप्पा स्वामी देवस्थानच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेमध्ये हजारो अय्यप्पा भक्त सहभागी झाले होते.
यात्रेमुळे सिद्धापूर चंद्रगुती रस्त्यावरील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. पोलिसांनी बॅरिकेड्सची व्यवस्था रस्त्यावर केली होती. तरी सुद्धा मद्यधुंद झालेल्या रोशन फर्नांडीसने आपली इको स्पोर्ट्स कार यात्रेमध्ये घुसविली. कार यात्रेच्या ठिकाणी घुसल्याने मोठा गोंधळ उडाला. कारने ठोकरल्याने दीपा गोड राजाननन हेगडे, कल्पना नाईक, गोविंद अवरगुप्पा, ज्योती नाईक, मादेवी होसूर, मारीरामप्पा बेन्नूर, गौरी मडिवाळ असे एकूण 9 भक्त जखमी झाले. गंभीररित्या जखमी झालेल्या दीपाला उपचारासाठी शिमोगाला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. आठपैकी कांही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर शिमोगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमी झालेल्यांवर सिद्धापूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संतप्त नागरिकांनी कार चालकाला ताब्यात घेवून पोलिसांच्या हवाली केले आणि कारची मोठी नासधूस केली. सिद्धापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.