महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अर्जुनाचे नेतृत्व मान्य करा

06:09 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

दारूकाला भगवंत आपल्याला येथेच सोडून निजधामाला जाणार आहेत असे वाटल्याने तो त्यांना म्हणाला, ज्याने तुमचा अपराध केला त्या जराव्याधालासुद्धा तुम्ही जवळ केलेत आणि त्याचा उद्धार केलात. मग माझा उद्धार तुम्ही का करत नाही? दारुकाची अवस्था अत्यंत शोचनीय झाली होती. तो तोंड खाली करून रडत असल्याने त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो मोठमोठ्याने हाका मारून श्रीकृष्णाची मनधरणी करू लागला. नशिबाला बोल लावू लागला. भविष्यात काय लिहिले आहे हेच त्याच्या लक्षात येईना. श्रीकृष्णाची पुन: पुन्हा विनवणी करू लागला. दारूकाची शोचनीय अवस्था श्रीकृष्णांना बघवेनाशी झाली. त्याचा कळवळा येऊन, अरे भिऊ नकोस, असे सांगून त्यांनी त्याला पूर्ण आश्वस्त केले. त्याला दिलासा देत म्हणाले, आत्ताच्या घडीला माझ्या अत्यंत जवळचा असा तू एकटाच राहिला आहेस. तुला माझे एक फार महत्वाचे काम करायचे आहे त्यासाठी मी तुला मागे ठेवले आहे.

Advertisement

श्रीकृष्णाचे बोल ऐकून दारुकाला मोठे नवल वाटले. तो लक्ष देऊन श्रीकृष्ण पुढे काय सांगत आहेत ते उत्सुकतेने ऐकू लागला. भगवंत म्हणाले, तू वेगाने द्वारकेला जा आणि तेथील लोकांना समस्त यादवांचे निधन झाल्याचे वृत्त दे. एकमेकांशी भांडूनतंडून, परस्परात लढून यादवांनी स्वत:चा अंत करून घेतला आहे अशी माहिती तेथील लोकांना दे. बलरामाने निजात्मस्थिती साधून योगगतीने देह त्यागल्याचे त्यांना सांग. तसेच माझी काय दशा झाली आहे तेही त्यांना सांग. पुढे असे सांग की, येथून पुढे द्वारकेमध्ये कोणीही राहू नका. तेथून ताबडतोब निघा अशी माझी आज्ञा आहे असे सांगितलेस तरी चालेल. श्रीकृष्णाचे बोल ऐकून दरुकाचा चेहरा प्रश्नार्थक झाला. यादवांचा नाश झाला, बलरामाने निजात्मस्थिती प्राप्त करून घेऊन योगगतीने देह त्यागला तसेच श्रीकृष्णांना जराव्याधाने बाण मारल्याने त्यांचाही अंत अटळ आहे हे सर्व त्याच्या लक्षात आले होते. परंतु द्वारकेतील लोकांनी तेथे न राहता तेथून निघून जावे अशी आज्ञा भगवंतानी का द्यावी, असा प्रश्न त्याच्या मनात आला होता.

कुणाच्याही मनातले सहज जाणून घेणारे भगवंत दारूकाच्या मनातला प्रश्न ओळखणार नाहीत असे कसे होईल? म्हणून ते म्हणाले, द्वारकेतील लोकांना तेथून निघा असे मी का सांगितले तेही मी तुला सांगतो. दारूका तू सज्ञान आहेस शिवाय तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच अंतकाळी तुला येथे ठेवून तुझ्याकडून द्वारकेतील लोकांचे प्राण वाचवावेत असे मी ठरवले आहे. त्याप्रमाणे तू त्वरित द्वारकेत जा. तेथील लोकांना माझी आज्ञा सांग. त्यांनी सरळपणे ऐकले तर ठीक, नाहीतर त्या सर्वांना बळजबरीने तेथून बाहेर काढ. हे सगळं करायचं कारण म्हणजे मी द्वारकेचा त्याग करून निजधामाला गेल्यावर समुद्र ती गिळून टाकेल. त्यामुळे सपूर्ण शहर जलमय होईल. द्वारका नगरी वसवण्यासाठी मी समुद्राकडे जागा मागितली होती आता मीच तेथे नाही हे लक्षात आल्यावर समुद्र नक्कीच ती बुडवून टाकेल. म्हणून उशीर न करता तू लगेच निघ. माझे मातापिता आणि सर्व प्रजाजन या सर्वांना तेथून बाहेर काढ. वेळ फार थोडा आहे समुद्र उसळी मारून पुढे यायच्या आत आपला सर्व समुदाय त्यांच्या सर्व सामानसुमानासह तेथून सुरक्षित स्थळी हलव. सर्वजण तेथून हलल्यावर तेथे चोर दरोडेखोर यांचे राज्य असेल. त्यामुळे तेथे कुणी एकटेदुकटे जाऊ नका हे सर्वांना समजावून सांग. सर्वांनी एकजुटीने रहा.

सगळ्यांनी अर्जुनाचे नेतृत्व मान्य करा. तो सांगेल ते ऐका आणि त्याच्याबरोबर ताबडतोब इंद्रप्रस्थाकडे प्रयाण करा. इंद्रप्रस्थाच्या वाटेवर असताना तोच सर्वांचे रक्षण करेल.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article