मनपातर्फे वृक्षारोपण-शोभेची झाडे लावण्याच्या कामाला गती
बेळगाव : शहरातील दुभाजकांवर शोभेची झाडे तसेच काही ठिकाणी वृक्षारोपण महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. शहरामध्ये जवळपास दोन हजारहून अधिक झाडे लावण्याचे लक्ष्य असून खुल्या जागांच्या ठिकाणी ही झाडे लावण्यात येत आहेत. शहरातील दुभाजकांवर शोभेची झाडे लावण्याचे काम पंधरा दिवसांपासून सुरू आहे, असे महानगरपालिकेतील पर्यावरण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात जास्तीत जास्त झाडे लावणे, तसेच दुभाजकांवर शोभेची झाडे लावून त्यांची जोपासना करण्याचे काम केले जाते. वनविभाग आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही रोपे लावली जात आहेत. सध्या शहरातील शिवाजी उद्यान परिसरात दुभाजकांसह उद्यानांमध्येही झाडे लावण्यात आली. कणबर्गी रोडवर झाडे लावण्याचे काम सध्या सुरू आहे. यापुढेही जास्तीत जास्त ठिकाणी झाडे लावण्याचे काम करणार असल्याची माहिती रिझवान यांनी दिली. चन्नम्मा सर्कल ते अशोक सर्कल, कणबर्गी रोड, महांतेशनगर परिसरात दुभाजकांवर शोभेची झाडे लावली आहेत. इतर भागातही ही झाडे लावणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावर्षी पावसाने चांगली साथ दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रोपे लावून पर्यावरण जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.