Solapur Crime : एसीबीने सोलापूरमध्ये भ्रष्टाचार प्रकरणात कृषी अधिकाऱ्याला पकडले रंगेहाथ
सोलापूर एसीबीच्या पथकाने तालुका कृषी अधिकाऱ्यावर केली कारवाई
सोलापूर : महाडीबीटी पोर्टलवर शेतीसाठी मिळणाऱ्या अनुदानाच्या अर्जाला पूर्वमंजुरी देण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी धनंजय सुभाष शेटे (वय ३१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सोलापूर युनिटने रंगेहाथ पकडले. तडजोडीअंती आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार यांचे वडील यांनी कृषी विभागाकडून मिळणाऱ्या शेती अवजारांसाठी 'आपले सरकार पोर्टलमार्फत ऑनलाईन अर्ज केला होता. या अर्जाला महाडीबीटीपोर्टलवर पूर्व मंजुरी देण्यासाठी आरोपी धनंजय शेटे यांनी २५ नोव्हेंबर रोजी १० हजारांची मागणी केली होती. तडजोड झाल्यानंतर ८ हजार रुपये घेण्याचे ठरले.
बुधवार २६ रोजी उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कक्षात आरोपी शेटे यांच्यासमोरील टेबलवरील कागदांमध्ये ठेवलेली ८ हजारांची रक्कम स्वीकारताना एसीबी पथकाने त्यांना सापळा रचून रंगेहाथ पकडले. आरोपीविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबीचे निरीक्षक शैलेश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.