अतिथी प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी अभाविपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : सरकारी पदवी महाविद्यालयात अतिथी प्राध्यापकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत असून, त्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. खासगी महाविद्यालयांमध्ये वर्ग व्यवस्थित चालतात. पण सरकारी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे सरकारने त्वरित अतिथी प्राध्यापकांची नेमणूक करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अनेक सरकारी पदवी महाविद्यालयांमध्ये गरीब, मोलमजुरी करणाऱ्यांची मुले आर्थिक टंचाईमुळे प्रवेश घेतात. मात्र दरवर्षी अतिथी प्राध्यापकांची संख्या नगन्य असल्याने ते शिक्षणात मागे पडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. यासाठी राज्य सरकारने भरती दरम्यान अशा परिस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढवा. सरकारी प्रथमश्रेणी कॉलेजमधील रिक्त अतिथी शिक्षकांची भरती प्रक्रिया पार पाडावी. महाविद्यालयातील मूलभूत सुविधांसाठी अनुदान द्यावे. प्रयोगशाळेतील उपकरणे, संगणक पुरविण्याची मागणीही केली.