‘अबुझमड, उत्तर बस्तर नक्षलमुक्त’
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा : छत्तीसगडमध्ये 170 नक्षलवाद्यांची शरणागती
वृत्तसंस्था/रायपूर
छत्तीसगडमध्ये गुरुवार, 16 ऑक्टोबर रोजी 170 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे आता अबुझमड आणि उत्तर बस्तर विभाग नक्षलमुक्त झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंबंधीची घोषणा केली असून महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांमध्ये नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे स्पष्ट केले. बुधवारी महाराष्ट्रात 61 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, तर छत्तीसगडमध्ये 27 जणांनी शस्त्रs खाली ठेवली. गेल्या दोन दिवसांत एकूण 258 लढाऊ प्रशिक्षित डाव्या विचारसरणीच्या नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक्स’वर आजचा दिवस नक्षलवादाच्या विरोधातील आपल्या लढाईतील एक ऐतिहासिक दिवस असल्याचे ट्विट केले आहे. आज गेल्या दोन दिवसात एकूण 258 युद्धप्रशिक्षित डाव्या विचारसरणीच्या नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा त्याग केला आहे. भारतीय संविधानावर विश्वास ठेवून हिंसाचाराचा त्याग करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे मी कौतुक करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या या समस्येचे निर्मूलन करण्यासाठीच्या अथक प्रयत्नांमुळे नक्षलवाद शेवटचा श्वास घेत आहे याचा हा पुरावा आहे, असेही शहा यांनी म्हटले आहे.
एकेकाळी दहशतवाद्यांचे गड असलेले छत्तीसगडमधील अबुझमड आणि उत्तर बस्तर आता नक्षलमुक्त घोषित झाल्याबद्दल अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला. दक्षिण बस्तरमध्ये आता नक्षलवादाचा कोणताही मागमूस शिल्लक नाही. आमच्या सुरक्षा दलाच्या अथक परिश्रमामुळे हे यश मिळाले असून लवकरच आमचे सुरक्षा दल नक्षलवादी तळ नष्ट करतील, असे शहा यांनी सांगितले. जानेवारी 2024 पासून छत्तीसगडमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर 2,100 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच 1,785 जणांना अटक करण्यात आली असून 477 जणांचा खात्मा करण्यात आला आहे. हे आकडे 31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचा आमचा दृढनिश्चय दर्शवतात, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
शरणागती पत्करणाऱ्यांचे स्वागत
अमित शहा यांनी नक्षलवादाबाबत सरकारचे धोरण स्पष्ट असल्याची भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. ज्यांना आत्मसमर्पण करायचे आहे त्यांचे स्वागत आहे आणि जे बंदुका सोडण्यास तयार नसतील त्यांना आमच्या सैन्याच्या रोषाचा सामना करावा लागेल, असे ते म्हणाले. जे अजूनही नक्षलवादाच्या मार्गावर आहेत त्यांना मी पुन्हा एकदा शस्त्रs टाकून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन करतो. आम्ही 31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे शहा म्हणाले.
नक्षलवाद तीन जिल्ह्यांपुरता मर्यादित
छत्तीसगडमध्ये आता नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित जिह्यांची संख्या केवळ तीन झाली आहे. फक्त विजापूर, सुकमा आणि नारायणपूर हे डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीवादाने सर्वाधिक प्रभावित जिल्हे आहेत. ‘नक्षलमुक्त भारत निर्माण करण्याच्या मोदी सरकारच्या दृष्टिकोनाकडे एक मोठे यश म्हणून नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित जिह्यांची संख्या सहा वरून तीनवर आली आहे, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी-प्रभावित जिह्यांची संख्या देखील 18 वरून फक्त 11 वर आली आहे. या 11 डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी-प्रभावित जिह्यांमध्ये विजापूर, दंतेवाडा, गरियाबंद, कांकेर, मोहला-मानपूर-अंबागड चौकी, नारायणपूर आणि सुकमा (सर्व छत्तीसगडमधील), पश्चिम सिंहभूम (झारखंड), बालाघाट (मध्य प्रदेश), गडचिरोली (महाराष्ट्र) आणि कंधमाल (ओडिशा) यांचा समावेश आहे.