Kolhapur Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
तरुणावर गुन्हा वाखल, संशयित पसार
कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने करवीर पोलीस ठाण्यात दिली. जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या काळात आपल्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी शिवम शशिकांत माने (रा. साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी एका हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. फेसबुकवरून तरुणीची शिवम सोबत मैत्री झाली. या ओळखीतून माने याने तरुणीस लग्नाचे आमिष दाखविले. आपण लवकरच लग्न करुया अशी बतावणी करुन पीडितेसोबत वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. काही दिवसांपासून पीडित तरुणी शिवमकडे लग्नाची मागणी करत होती.
मात्र शिवमने टाळाटाळ करत तरुणीशी संपर्क तोडला. ड यानंतर त्या तरुणीने करवीर पोलीस ठाण्यात माने विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच माने पसार झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महाडिक करत आहेत.