नुकसानभरपाई न दिल्याने बस जप्तीची नामुष्की
व्याजासह नुकसानभरपाई देण्याचा न्यायालयाच आदेश
प्रतिनिधी/ बेळगाव
बस अपघातातील जखमीला व्याजासहित नुकसानभरपाई न दिल्याने परिवहन मंडळाची बस जप्त करण्यात आली आहे. वेळेत नुकसानभरपाई केएसआरटीसीने न दिल्याने त्यांच्यावर बस जप्तीची नामुष्की ओढवली आहे.
मोहम्मदअली मदरसाब निडोणी (रा. मुतगा) हे 12 ऑगस्ट 2022 ला बेळगावहून मुतगा गावच्या दिशेने जात होते. त्यावेळी केएसआरटीसी मंडळाच्या बसने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. नुकसानभरपाईसाठी मोहम्मदअली निडोणी यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने त्यांना 6 लाख 83 हजार 773 रुपये नुकसानभरपाई तसेच 6 टक्के दराने व्याज देण्याचा आदेश केएसआरटीसी प्रशासनाला दिला.
न्यायालयाने आदेश येऊन देखील परिवहन मंडळाने नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे 27 ऑगस्ट 2024 रोजी न्यायालयाने जप्तीचे आदेश दिले. त्यानुसार केएसआरटीसीच्या ताफ्यातील बस जप्त करण्यात आली. जखमीच्यावतीने अॅड. आनंद घोरपडे व विशाल पाटील यांनी काम पाहिले. जप्ती प्रक्रियेवेळी न्यायालयीन अधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.