दुसऱ्या कसोटीसाठी पाक संघात अब्रार, कामरान यांचा समावेश
रावळपिंडी : बांगलादेशकडून पहिल्या कसोटीत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या संघात काही बदल केले असून स्पिनर अब्रार अहमद व फलंदाज कामरान गुलाम यांना संघात स्थान दिले आहे. 30 ऑगस्टपासून ही कसोटी येथे सुरू होणार आहे. अब्रार व कामरान दोघांनीही इस्लामाबाद क्लब येथे झालेल्या बांगलादेश अ संघाविरुद्धच्या सामन्यात भाग घेतला होता. 20 ते 23 ऑगस्ट या दरम्यान हा सामना झाला होता. अब्रार हा लेगस्पिनर असूने उपखंडातील खेळपट्ट्यांची त्याला चांगली जाणीव आहे. त्याच्या समावेशामुळे पाकची फिरकी गोलंदाजीची बाजू भक्कम होणार आहे. कामरान हा मध्यफळीतील भरवशाचा फलंदाज असून त्याच्या समावेशामुळे पाकच्या फलंदाजी लाईनअपला स्थिरता येईल. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीही संघात पुन्हा सामील होणार आहे. याशिवाय अष्टपैलू आमीर जमाल याचेही पुनरागमन झाले आहे.