पालनगरीत उसळला जनसागर; यात्रेला सुमारे सहा लाखांवर भाविकांची उपस्थिती
उंब्रज प्रतिनिधी
खंडोबाच्या नावानं चांगभलं... यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करत खोबरे भंडाऱ्यांची उधळण करत लाखो भाविकांनी पाल नगरी दुमदुमून सोडली. सुमारे सहा लाखांवर भाविकांच्या उपस्थितीत मल्हारी म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा गौरज मुहूर्तावर संपन्न झाला. लाखों जनतेचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असणाऱ्या पाल ता. कराड येथील श्री खंडोबा देवाची यात्रेचा मुख्य दिवस सोमवारी संपन्न झाला.
ऐतिहासिक पाल ता.कराड येथील खंडोबा देवाच्या यात्रेचा सोमवारी २२ रोजी मुख्य दिवस होता. उंब्रज पोलीस व प्रशासनाने यात्रेत वेळोवेळी केलेल्या बदलांंमुळे यात्रा सुखकर पार पडली. वाळवंटात बांधलेल्या पुराने मिरवणूक मार्गावर पडणारा ताण कमी झाला. तारळी नदीपात्रातील दक्षिणोत्तर बाजू भंडारा खोबऱ्याच्या उधळण्यासाठी भाविकांच्या गर्दीने खचाखच भरले होते. पाल नगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा खोबऱ्याच्या उधळणीने पिवळा धमक झाला.
खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध गावातील खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासन काट्या, पालखीसह देवस्थानच्या आकर्षक रथातून प्रमुख मानकरी देवराज पाटील यांना घेऊन निघालेली शाही मिरवणूकीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. दुपारी ३ वा.च्या सुमारास खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सर्व विधी आटोपून दुपारी ४.१५ वा. च्या सुमारास मानकरी देवराज पाटील देवाचे मुखवटे पोटात बांधून अंधार दरवाजा जवळ आले. याठिकाणी रथात विराजमान झाले व तेथून मुख्य मिरवणूकीस सुरूवात झाली.
मानकऱ्याचे गाडे, फुलांनी सजवलेल्या अबदागीरी, चोपदाराचा घोडा, सासन काठ्या,पालखी,मानाचे गाडे या पाठोपाठ शाही थाटात खंडेराया व म्हाळसा यांना रथातून घेवून निघालेले मानकरी अशी भव्य दिव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करत सदानंदाचा येळकोट घे... येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करीत देवाचे दर्शन घेतले. नेहमी मुख्य मिरवणूक सुरु होताच या मार्गावर भाविकांची गर्दी होते. मात्र यावर्षीही ही गर्दी तारळीच्या वाळवंटात दिसून आली. मागील पाच वर्षाषापासून देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी व प्रशासन यांनी यात्रेपुर्व केलेल्या योग्य नियोजनामुळे तारळी नदी वरील मुख्य पूलावरील गर्दी नियंत्रण राहण्यासाठी मदत झाल्याचे दिसून आले.
सायंकाळी वाळवंटातून देवाची शाही मिरवणूक मारुती मंदिर मार्गे बोहल्या जवळ आली. यावेळी खंडेरायाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. देव मंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले व देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले व पारंपारीक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. तर देवाच्या या विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्याचे भाग्य मराठी, कन्नड आंध्र भाषिकांच्या चेहर्यावर जाणवत होते.
मिरवणूकीच्या वेळी झालेली अलोट गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी चोख बंदोबस्तासाठी बँरिगेटस् उभारले होते. काशिळ मार्गे येणारे भाविक प्रथम थेट वाळवंटात पाठवण्यात आले. हरपळवाडी व मंदिरातून येणाऱ्या भाविकांना उत्तर बाजूचे पुलावरून वाळवंटात सोडण्यात आल्याने बहुतांश भाविकांची गर्दी वाळवंटात थोपावण्यात आली. वडगाव ते पाल रस्ता आपत्कालीन मार्ग म्हणून राखीव ठेवण्यात आला होता सायंकाळी मात्र या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचे चित्र होते.यात्रेसाठी पाल ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बदे तसेच विविध विभागांचे अधिकारी तळ ठोकून होते.