Sangli News : दिघंचीत आगीमध्ये सुमारे 30 एकर ऊस खाक
दिघंचीत आगीत 13 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जळून खाक
दिघंची : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील तरटी मळा येथे अचानक लागगेल्या आगीने १३ शेतकऱ्यांचा एकूण अंदाजे ३० एकर ऊस जळून खाक झाला. हि घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीने बघता बघता सुमारे तीस एकर ऊस जळून खाक होत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दिघंचीमधील तरटी मळा परिसर हा बागायत क्षेत्राचा परिसर म्हणून ओळखला जातो. निंबाळकर तलाव जवळ असल्यामुळे तसेच यावर्षी झालेल्या पाऊसामुळे ऊस क्षेत्रात बाढ झालेली आहे. या ठिकाणी ऊस तोडणीसाठी टोळ्या देखील आल्या आहेत. काही शेतकऱ्यांची ऊस तोडणी देखील सुरु आहे.
परंतु रविवारी लागलेल्या आगीने बघता बघता १३ शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास आगीनेहिरावून घेतला. येथील शेतकऱ्यांनी लागलेली आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु सलग असणाऱ्या ऊस क्षेत्रामुळे आग आटोक्यात आणता आली नाही.
लागेल्या आगीमध्ये पांडुरंग नाना मोरे, सर्जेराव नाना मोरे, हणमंत राव नाना मोरे, जोती चव्हाण, चंद्रकांत मोरे, मीना चव्हाण, संभाजी मोरे, तानाजी निंबाळकर, बिलास निंबाळकर, ब्रह्मदेव निंबाळकर, मारुती नळ, नामदेव मोरे, आकाराम मोरे या शेतकऱ्यांचा सुमारे तीस एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला.
काहि ठिकाणी तात्काळ जेसीबी व ट्रॅक्टर च्या सहाय्याने सलग असणाऱ्या ऊस काढून आग लागलेल्या सलग ऊस क्षेत्रात अंतर पाडण्यात आले. त्यामुळे बाकीच्या ठिकाणचा ऊस आगीपासून सुरक्षित राहिला. नेमकी आग कशामुळे लागली याबाबत तर्क वितर्क लावले जात असले तरी लागलेल्या आगीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.