फ्रान्समध्ये गर्भपात हा घटनात्मक अधिकार
जगातील पहिला देश ठरला
वृत्तसंस्था/ फ्रान्स
महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे. फ्रान्सच्या घटनेत गर्भपाताच्या अधिकाराला सामील करण्यात आले आहे. महिला अधिकार गटांनी एकीकडे याला ऐतिहासिक पाऊल ठरविले आहे. तर दुसरीकडे गर्भपातविरोधी समुहांनी या निर्णयाची निंदा केली आहे.
फ्रान्सच्या संसदेच्या संयुक्त सभागृहात गर्भपाताच्या अधिकाराशी निगडित विधेयकाच्या बाजूने 780 तर विरोधात 72 मते पडली आहेत. या निर्णयानंतर गर्भपात अधिकार कार्यकर्त्यांनी मध्य पॅरिसमध्ये एकत्र येत सरकारचे कौतुक केले आहे. गर्भपाताच्या अधिकाराला देशाच्या मूळ कायद्यात सामील करणाऱ्या संसदेवर गर्व आहे. अशाप्रकारचे पाऊल उचलणारे आम्ही पहिले देश ठरलो आहोत असे संसदेच्या सभापतींनी म्हटले आहे.
महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. आता हे आश्वासन पूर्ण झाल्याचे वक्तव्य फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काढले आहेत.
अमेरिका आणि अन्य देशांच्या तुलनेत फ्रान्समध्ये गर्भपाताच्या अधिकारावरून अधिक सजगता आहे. फ्रान्समध्ये सुमारे 80 टक्के लोकांनी गर्भपाताला कायदेशीर अधिकार देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. शरीर तुमचे आहे आणि त्याच्यासोबत काय करायचे याचा निर्णय दुसरा कुणी घेऊ शकत नसल्याचा संदेश आम्ही सर्व महिलांना देत आहोत असे पंतप्रधान गॅब्रिएल अत्तल यांनी म्हटले आहे.
फ्रान्सच्या संसदेत यापूर्वीच घटनेच्या अनुच्छेद 34 मध्ये दुरुस्तीसाठी एका विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती. या विधेयकाद्वारे महिलांना गर्भपाताच्या अधिकाराची हमी देण्यात आली होती. फ्रान्समध्ये 1974 च्या कायद्यापासून महिलांना गर्भपाताचा कायदेशीर अधिकार प्राप्त आहे. महिलांना गर्भपाताच्या घटनात्मक अधिकाराला मान्यता देणाऱ्या रोई व्हर्सेस वेड या खटल्याच्या निर्णयाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 2022 मध्ये पालटले होते. यानंतर पूर्ण जगाच्या नजरा फ्रान्सच्या या पावलावर केंद्रीत झाल्या होत्या.