गणेबैल नाक्यावरील टोल आकारणी बंद करा
के. पी. पाटील यांचे निवेदन
खानापूर : खानापूर-बेळगाव रस्त्यावरील गणेबैल येथील टोलनाका बेकायदेशीर असून रस्त्याचे काम पूर्ण होण्याअगोदरच टोल आकारणी सुरू असून कर्मचारी नागरिकांशी उद्धट वर्तन करत आहेत. तसेच शेतकऱ्यांची अद्याप नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. ती देण्यात यावी, रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल आकारणी पूर्णपणे बंद करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील यांनी खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांना देवून सविस्तर माहिती दिली. आणि टोल आकारणी बंद करण्याची मागणी केली. बेळगाव-गोवा महामार्ग नव्याने तयार केला आहे. मात्र या रस्त्याचे काम अद्याप अर्धवट असताना खानापूर-बेळगाव मार्गावर गणेबैल येथे दीड वर्षापासून टोल आकारणी सुरू केली आहे. ही टोल आकारणी बेकायदेशीर असून गेल्या 12 वर्षापासून रस्त्यासाठी शेतजमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई दिलेली नाही. असे असताना टोलनाका सुरू करून तालुक्यातील नागरिकांची लूट करण्यात येत आहे. यासाठी खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करून टोल आकारणी बंद करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.