ग्रामपंचायतींची नवीन कर प्रणाली रद्द करा
हिंडलगा ग्रा.पं. ची मागणी, जि. पं. कडे निवेदन
बेळगाव : ग्रामविकास आणि पंचायत राज्यखात्याने वाढविलेली नवीन कर प्रणाली रद्द करावी अशी मागणी हिंडलगा ग्रा. पं. तर्फे जिल्हा पंचायतीकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्याकडे सादर केले आहे. ग्रामविकास आणि पंचायत राज्य खात्याने 2023-24 सालात ग्राम पंचायतमधील कर प्रणालीमध्ये वाढ केली आहे. हिंडलगा ग्रा. पं. अखत्यारीतील भू-खंडावर 10 टक्के कर वाढ केली आहे. ग्रा. पं. च्या सर्व साधारण सभेत हा नवीन कर रद्द करावा याबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे. या नवीन कराला सर्वसामान्य जनेतूनही विरोध होत आहे.
त्यामुळे ग्रा. पं. मधील कामावर याचा परिणाम होत आहे. हिंडलगा ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये या नवीन कराची आकारणी केली जात आहे. त्यामुळे सर्व सामान्यांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. ही नवीन कर प्रणाली रद्द करून नवीन योग्य कर लागू करावा अशी मागणी ग्रा. पं. सदस्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा चेतना अगसगेकर, सदस्य बबिता कोकितकर, विठ्ठल देसाई, रामचंद्र मन्नोळकर, डी. बी. पाटील, प्रविण पाटील, भाग्यश्री कोकितकर, अशोक कांबळे, संगीता पलंगे, आरती कडोलकर आदी उपस्थित होते.