कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी आबिटकर
कोल्हापूर :
कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची माळ अखेर शिवसेना शिंदे गटाचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या गळ्dयात पडली असून सहपालकमंत्रिपदाचा कार्यभार पुणे जिह्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपवला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना वाशिम जिह्याचे पालकमंत्रिपद तर उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगली जिह्याचे पालकमंत्रिपद दिले आहे. कोल्हापूर जिह्याच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये स्पर्धा लागली होती. यामध्ये अखेर संख्याबळाच्या ताकदीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बाजी मारली आहे.
राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ शपथविधी आणि खाते वाटपानंतर जिह्याचे पालकमंत्री कोण होणार, याकडे जिह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. पालकमंत्रिपद निश्चित झाले नसल्यामुळे महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतरही जिह्यातील विकासकामे रखडली आहेत. यापूर्वी हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी जिह्याचे पालकमंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे. साहजिकच या दोन्ही नेत्यांकडून पालकमंत्री पदासाठी पुन्हा प्रयत्न सुरु होते. तर जिह्यातील आमदारांच्या संख्याबळावर पालकमंत्री पद आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न पणाला लावले होते. विशेषत: राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाबाबत चांगलीच स्पर्धा लागली होती. यामध्ये शिवसेनेचे मंत्री प्रकाश आबिटकर यशस्वी ठरले आहेत.
मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गेल्या दहा वर्षात राधानगरी विधानसभा मतदारसंघाबरोबरच जिह्यातील अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कोणताही प्रश्न असो, अथवा योजना त्या मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळेच राधानगरी मतदारसंघातून जनतेने त्यांना हॅट्ट्रिक करण्याची संधी दिली. शिवसेनेचे जिह्यातील आमदारांचे संख्याबळ पाहता अन्य घटक पक्षांच्या तुलनेत जास्त आहे. याचा आधार घेऊनच मंत्री आबिटकर यांना पालकमंत्री पद दिले असल्याचे समजते. कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात शिवसेनेला पहिल्यांदाच पालकमंत्री पदाची संधी मिळाली आहे.
पालकमंत्री पदी संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार. जिह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना जिह्यातील महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन जिह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे.
प्रकाश आबिटकर,पालकमंत्री