For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिष्टचिंतन श्री किरणजी ठाकूर

10:43 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
अभिष्टचिंतन श्री किरणजी ठाकूर
Advertisement

समूह प्रमुख तरुण भारत संस्थापक - चेअरमन लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.

Advertisement

दीपस्तंभ !

ज्या ज्या भागात आज दैनिक तरुण भारत पोहचतोय त्या त्या भागातील जनतेशी आपुलकीने नाते जोडण्याचे व अखंड मैत्रीचा धागा किरण ठाकुर यांनी बांधला आहे. आपल्या दारात आलेल्या याचकाला कधीही रिकाम्या हाती पाठविले नाही. दिलदार वृत्तीने त्यांनी नेहमीच उपेक्षा सहन केली. डोक्यावर सातत्याने संकटाची तलवार लोंबकळत राहिली. परंतु पर्वा केली नाही. एका बाजूने संकटांशी सामना केला व दुसऱ्या बाजूने मने जोडली. स्वर्गीय बाबुराव ठाकुर यांच्यानंतर श्रीयुत किरण ठाकुर यांनी वर्तमानपत्राचा वारसा चालवला असून यात आता कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर तसेच संचालिका सई ठाकुर यांचेही अमुल्य योगदान, मार्गदर्शन लाभत आहे. ‘तरुण भारत’ची कीर्ति सर्वदूर पोहचवणाऱ्या व लोकमान्यच्या माध्यमातून सहकारात प्रगती करणाऱ्या अशा या दिलदार व्यक्तिमत्त्वाला आज टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची मानाची डी.लीट दिली जात आहे तसेच रविवार 7 एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने....

Advertisement

मनुष्याने समुद्राप्रमाणे असावं

भरतीचा माज नाही

अन् ओहोटीची पर्वा नाही

तरीसुद्धा हा अथांग..!

काही माणसांचा जन्म हा दुसऱ्यांसाठी काहीतरी देण्यासाठी असतो. दुसऱ्यांना सुगंध देण्यासाठी चंदन स्वत:ला झिजून घेते. आपण अनेक माणसे जीवनात अनुभवतो. त्यातील काही माणसे नेहमीच तुमच्या हृदयाच्या कोनाड्यात घट्ट बसून राहतात. अशी माणसे नेहमीच विशाल हृदयाची व अथांग कीर्ती पसरलेली असतात. आपल्या अनेकांच्या परिचयात आलेले आणि आपणा सर्वांच्या हृदयात वास करून असणारे किरण ठाकुर उर्फ ‘मामा’ हे असं एक व्यक्तिमत्त्व आहे ज्या व्यक्तीला आपण कधीही विसरू शकणार नाही. किरण ठाकुर या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिल्यानंतर साहजिकच आपल्याला ‘सुखी माणसाचा सदरा’चे एक उदात्त उदाहरण आढळून येते. ‘जगाच्या कल्याण्या संतांची विभूती’ असे म्हटले जाते. किरण ठाकुर यांच्या परिचयात 35 वर्षांपूर्वी आलो आणि तिथे जी मैत्री जमली ती कायमचीच. परिस्थिती अशी होते की या व्यक्तीमधील गुण पाहिल्यानंतर या व्यक्तीपासून आपण कधीही दूर होऊच शकत नाही. अस्मादिकाचे मामांशी असलेले नाते हे वेगळेच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मालकीच्या वृत्तपत्रात एक कर्मचारी म्हणून काम करताना कधीही असे त्यांनी जाणवू दिले नाही की आपण मालक आहे. त्याचे कारणच असे की मनाची विशालता. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या सर्वांनाच मानसन्मान देणे. त्यांच्याबरोबर आपुलकीने वागणे. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांशी मित्रत्वाचे संबंध ठेवणारा असा मालक सापडणे क्वचितच शक्य असते.

आयुष्यभर काय मिळविले? असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मामांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्यांनी अफाट लोकसंग्रह केला. माणसे जोडण्याचे काम दैनिक ‘तरुण भारत’तर्फे वा त्या माध्यमातून केला. बेळगावात शंभर वर्षांपूर्वी वडिलांनी सामाजिक चळवळीतून या वृत्तपत्राचे छोटेसे रोपटे लावले व त्याचा वेल गगनावरी नेण्याचे काम किरण ठाकुर यांनी केले. बेळगावनंतर सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा, सोलापूर अशा एकापेक्षा एक आवृत्त्या काढल्या. माणसे जमविली आणि ती सांभाळली देखील. अनेक व्यक्ती, अनेक पत्रकार ‘तरुण भारत’ने घडविले. ‘तरुण भारत’मध्ये सेवा बजावित राहिले व तिथेच निवृत्तही झाले. आज एक वृत्तपत्र चालविणे ही सोपी गोष्ट राहिलेली नाही. मामांना बेळगावात ‘तरुण भारत’ला मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांनी हळूहळू पंख पसरविण्याचा जो प्रयत्न केला तो सर्वत्र यशस्वी ठरला. त्यातल्या त्यात एक राज्य पातळीवर वृत्तपत्र नेण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने यशस्वी झाला तो गोव्यात. गोव्यात 1984 मध्ये प्रवेश करताना कित्येकांनी ‘भायलो पेपर’ (बाहेरचे वृत्तपत्र) पासून अनेक अपमानास्पद पद्धतीने शीर्षके लावली. परंतु जे गोव्यात राहून वृत्तपत्रांना शक्य झाले नाही त्या गोष्टी ‘तरुण भारत’ने बेळगावात राहून तिथे छपाई करून गोव्यातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनण्यापर्यंत मजल गाठली. हा सारा चमत्कार होता की जादू होती. जादू त्या हातात होती. जादू त्या हृदयात होती. सर्वात मोठा जादूगार म्हणजे किरण ठाकुर.

आपल्या वडिलांपासून पत्रकारितेचा आणि समाजसेवेच्या व्रताचा वारसा घेऊन केवळ ध्येयाने पेटून उठलेल्या किरण ठाकुर यांनी बेळगाव, निपाणी, हल्ल्याळ, कारवार, खानापूर आदी सीमाभागातील मराठी बांधवांच्या हितासाठी संघर्ष केला. ते करीत असताना कर्नाटक सरकारचा अत्याचारही सहन केला. सीमाप्रश्नाचा हा लढा स्वातंत्र्याएवढाच प्रखर झालेला होता. विविध विचारांची मंडळी एकत्र आलेली कोणी कोणाला चिथावणी देत होते आणि संघटनेमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र रचणाऱ्यांनी नाना तऱ्हेची कारस्थाने केली. मात्र वडिलांचा वसा घेतलेले किरण ठाकुर हे कोणत्याही प्रसंगाला डगमगले नाहीत. अनेक संकटांना सामोरे गेले. दैनिक ‘तरुण भारत’ला कर्नाटक पोलिसांनी वेढा घातला. मात्र ध्येयवेडाने सुसाट जाणाऱ्या किरण ठाकुर यांचा अश्वमेध पुढे जात राहिला. ज्या ज्या भागात आज दैनिक ‘तरुण भारत’ पोहचतोय त्या त्या भागातील जनतेशी आपुलकीने नाते जोडण्याचे व अखंड मैत्रीचा धागा किरण ठाकुर यांनी बांधला आहे. आपल्या दारात आलेल्या याचकाला कधीही रिकाम्या हाताने पाठविले नाही. दिलदार वृत्तीने त्यांनी नेहमीच उपेक्षा सहन केली. डोक्यावर सातत्याने संकटाची तलवार लोंबकळत राहिली. परंतु पर्वा केली नाही. एका बाजूने संकटांशी सामना केला व दुसऱ्या बाजूने मने जोडली. वाढती बेरोजगारी चिंतेचा विषय. काम करण्याची क्षमता असून संबंधितांच्या हाताना काम मिळत नाही. यामागील नेमकी समस्या जाणून घेऊन 26 वर्षापूर्वी टिळकवाडी, बेळगाव येथे एक भन्नाट कल्पना त्यांनी आपल्या मित्रांसमोर मांडली. कल्पनाविष्कार प्रत्यक्षात साकार करण्याचे ध्येय घेऊन त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी एक साहसी पाऊल उचलले व त्यातून सहकार तत्वातून ‘लोकमान्य को. ऑप. क्रेडीट सोसायटी’ची स्थापना केली.

पत्रकारितेतून सहकार क्षेत्रात उडी घेण्यासाठी मामांनी आपली कार्यसिद्धता पणास लावली. सोसायटी स्थापन केली आणि वर्षभरात या सोसायटीला एवढा उदंड प्रतिसाद मिळाला की लागलीच आणखी एका भागात त्याची शाखा सुरु केली. लागलीच तिथेही उदंड प्रतिसाद मिळाला. आणखी एका भागात शाखा काढली आणि दहा हजार जणांना रोजगार संधी मिळवून देऊ अशी घोषणा केली. मामांनी आजवर जे संकल्प सोडले ते परिपूर्ण करण्यासाठी त्यांनी आपली सारी शक्ती पणास लावली. शक्ती आणि युक्तीचा संगम झाल्यानंतर कोणत्याही गोष्टी अशक्य नाहीत. लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची प्रेरणा वडिलोपर्जित किरण ठाकुर यांना प्राप्त झालेली होती. आपण जी क्रेडीट सोसायटी स्थापन करतो तिला लोकमान्यता मिळावी यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर किरण ठाकुर यांनी या सोसायटीला संपूर्ण कर्नाटकात कुठेही शाखा उघडायला परवानगी मिळविली व त्यानंतर बहुराज्य सोसायटीचा दर्जा प्राप्त करून घेतला व गोव्यात पहिले क्रांतिकारक पाऊल उचलले. गोव्यातही या संस्थेचे जोरदार स्वागत झाले. त्यानंतर महाराष्ट्र पादाक्रांत केला. त्याही पुढे जाऊन देशाच्या राष्ट्रीय राजधानीत म्हणजेच दिल्लीमध्ये देखील शाखा उघडली. आज लोकमान्यच्या 200 पेक्षाही जास्त शाखा आहेत. गोव्यात 55 शाखा आणि या संस्थेचा सामाजिक क्षेत्रातील प्रवेश हा अत्यंत वाखणण्याजोगा आहे. अनेक शैक्षणिक संस्थांना मदत आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन, अनेक सामाजिक उपक्रमांतर्गत अडल्या नडलेल्यांना मदत आणि आज संस्थेने थेट दोन हजार जणांना रोजगार आणि 50 हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळवून दिला आहे.

एक व्यक्ती काय करू शकते! त्यासाठी सामर्थ्य पाहिजे. संत रामदास स्वामींनी म्हटलेलेच आहे... सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाची । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे.

मामांनी आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये व सहकाऱ्यांमध्ये देव पाहिला. लोकमान्यच्या माध्यमातून गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक इत्यादी भागांमध्ये फार मोठी सामाजिक चळवळही उभारली. ‘लोकमान्य’ला लोकमान्यता मिळविण्यात किरण ठाकुर यांचे फार मोठे योगदान आहेच. शिवाय सिंहाचा वाटा आहे. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी केवळ वित्तीय संस्थाच आहे असे नाही तर ती एक फार मोठी सामाजिक चळवळ आहे. आज 200 पेक्षा जास्त शाखा तेवढेच शाखा व्यवस्थापक. ‘तरुण भारत’च्या 8 आवृत्या तेथील मुख्य अधिकारीवर्ग या सर्वांच्या संपर्कात राहून देशातील राष्ट्रीय पातळीवरील अनेक राजकीय नेत्यांच्याही तेवढ्याच पद्धतीने संपर्कात राहून हा एवढा मोठा डोलारा सांभाळणे हे काही येऱ्या गबाळ्याचे काम नाही. एवढे असून देखील चेहऱ्यावर नित्य नवा आनंद, उत्साहाला तर मर्यादा नाहीच. व्याप वाढला असला तरी देखील कोणत्याही संकटांना हसतमुखपणे तोंड देणारे किरण ठाकुर यांना पाहताच आपल्याला सुखी माणसाची व्याख्या दिसणार नाही तर नेमके काय दिसणार? दैनिक ‘तरुण भारत’असो वा लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी असो या दोन्ही परिवारासाठी मामा हा एक दीपस्तंभच आहे. ‘तरुण भारत’च्या माध्यमातून 5 हजार पेक्षाही जास्त जणांना प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष रोजगार देणारे लोकमान्यच्या माध्यमातून 50 हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध करून देणारे किरण ठाकुर हे म्हणजे सामाजिक बांधिलकी राखून जनसेवा करणारे उद्योजकही आहेत. पत्रकारही आहेत आणि समाजसेवा क्षेत्रातील अध्वर्यूच आहेत. आजही दिवसाचे 17 ते 18 तास काम करणारे किरण ठाकुर आपल्या कार्याची व्याप्ती वाढवित आहेत. मोठ्या प्रमाणात युवावर्गाला रोजगार संधी प्राप्त करून देण्याचे एक स्वप्न त्यांनी पाहिले व त्यांना संकल्पपूर्ती करायची आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ‘मामां’नी अनेक क्षेत्रे आज पादाक्रांत केलेली आहेत. समाजसेवा हे मुख्य ब्रिद आहे आणि त्यासाठी दैनिक ‘तरुण भारत’ हे एक अत्यंत प्रभावी माध्यम म्हणूनच त्यांनी पुढे नेले. 1994 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांचे फोटो प्रसिद्ध करून गोव्यातच नव्हे तर देशात उच्चांक करणाऱ्या मामांनी तब्बल 3500 उमेदवारांचे फोटो त्या काळात आजच्या सारख्या कोणत्याही सुविधा व यंत्रणा नसताना प्रसिद्ध केले. आश्चर्याची बाब म्हणजे त्याकाळी ‘तरुण भारत’ बेळगावहून छपाई करून गोव्यात येत असे. ज्येष्ठ पत्रकार व संपादक राहिलेले नारायण आठवले यांनी एकदा मामांना सांगितले की तुमचा पेपर गोव्यातील सर्व वर्तमानपत्रांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर जाईल. तुम्ही त्यासाठी केलेली मेहनत व तुमचे धोरण यामुळे वर्तमानपत्र पहिल्या क्रमांकाचे ठरणार. त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. 1999 पासून ‘तरुण भारत’ने सर्व वृत्तपत्रांवर मात करून आजतागायत पहिला क्रमांक सोडला नाही. मामा म्हणतात ही सारी जनतेची किमया आहे. आपल्या सहकाऱ्यांमुळे (कर्मचाऱ्यांमुळे) हे शक्य झाले. ‘तरुण भारत’मधील प्रत्येक कर्मचारी हे स्वत:चे वर्तमानपत्र आहे, या भावनेने काम करतोय. कर्मचारीवर्गाला सहकारी म्हणणारे मामा जेव्हा शक्य होईल तेव्हा त्यांच्या पाठिवर हात ठेवणारे मामा म्हणजेच एक अद्भूत शक्ती आहे. त्यांचा आशीर्वाद पाठिशी असल्यानंतर कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास कर्मचारीवर्ग सज्ज राहतात. सकारात्मकता बाळगून ते पुढे जातात व आपल्याबरोबर इतरांनाही पुढे घेऊन जातात. मामा हे स्वत: दानशूर व्यक्तिमत्त्व आहे. लोकमान्यच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी मदत केली. अनेकविध उपक्रम राबवून जनतेचे लोकमान्यशी ऋणानुबंध वाढविण्याचे पवित्र कार्य त्यांनी केलेले आहे. उत्साहाचा झरा असलेले दुसऱ्यांसाठी प्रेरणास्थान असलेले आणि कर्मचारीवर्गासाठी प्रेमळ ठरलेले ‘मामा’ आपल्या सर्व कर्मचाऱ्यांवर नेहमीच विश्वास ठेवून असतात. विश्वासाला तडा देणारी व्यक्ती मामांच्या हृदयातून बाजूला होते. हे सारे जग विश्वासावर चालते. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आपली फार मोठी जबाबदारी आहे. जनतेत विश्वासार्हता निर्माण करण्याची हेच ब्रिदवाक्य घेऊन त्यांनी सर्व कर्मचारीवर्गाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. दैनिक ‘तरुण भारत’चा बुलंद आवाज सर्वत्र पसरविण्यात विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. यातूनच मामा हे सर्वांचे प्रेरणास्थान बनलेले आहेत. ‘इतरांचे हृदय जिंकणे हाच जीवनाचा हेतू असावा कारण जग जिंकून देखील सिकंदर रिक्त हाताने गेला होता’. याच न्यायाने किरण ठाकुर सर्वांनाच मार्गदर्शन करीत आहेत. किरण ठाकुर हे अन्यायाविरुद्ध लढताना सूर्याचे प्रखर किरण बनतात, तर प्रसंगी सहानुभूती आणि प्रेमाची पाठीवर थाप देताना चंदामामाची शितल किरणेही बरसतात. मामांच्या जीवनात अनेक अडचणी आल्या. विरोध झाला. वेळप्रसंगी अवमानही सहन केला. कोणी नावे ठेवली. कोणी पाय ओढले सर्व प्रसंगाना तोंड देत राहिले. मात्र ध्येय साध्य होण्यासाठी आणि सत्याचा मार्ग हा काटेरी असून देखील त्यामार्गाने जाण्यासाठी मान, सन्मान, इगो, अहंकार या सर्वांपासून ते अलिप्त राहिले. एका वटवृक्षात रुपांतर केले आणि आजही ते सर्व सहकाऱ्यांना एकच मंत्र देतात, भिऊ नकोस मी तुमच्या पाठिशी आहे. याचा अनुभव केवळ अस्मादिकानेच नव्हे तर असंख्य सहकाऱ्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या वाढदिनी अगणित शुभेच्छा. किरण ठाकुर म्हणजे ‘निश्चयाचा महामेरु आणि बहुत जनांसी आधारु’ तमाम जनतेचे आशीर्वाद व प्रेम हेच त्यांचे खरे बळ आहे. त्यावर दृढविश्वास ठेवणाऱ्या मामांना वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा !

‘लोकमान्य’ची भरारी

तऊणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार उपलब्ध करून देणारे व्यावसायिक निर्माण व्हावेत, या उद्देशाने  किरण ठाकुर यांनी 31 ऑगस्ट 1995 रोजी ‘लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटी’ची स्थापना केली. मागच्या अडीच ते तीन दशकांच्या प्रवासात किरण ठाकुर यांच्या नेतृत्व, मार्गदर्शनाखाली ‘लोकमान्य’ने सहकार क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. कर्नाटकात सुरु झालेल्या या सोसायटीचा प्रवास अगदी इतर राज्यातही पोहचला आहे. ग्राहकांचा मिळालेला विश्वास सार्थ ठरवत किरण ठाकुर यांनी लोकमान्य संस्थेला महाराष्ट्र, गोवा व दिल्लीतही नेण्यात यश मिळवले आहे. आजमितीला सोसायटीच्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्ली या राज्यांत मिळून 213 शाखा असून, आठ हजार कोटींपेक्षा अधिक ठेवी आहेत. पारदर्शकता व विश्वासार्हता हे लोकमान्यचे वैशिष्ट्या आहे. त्या बळावर श्रीयुत किरण ठाकुर यांनी लावलेल्या या रोपट्याचे आता वटवृक्षात ऊपांतर झाले आहे. अर्थसेवेतून मिळविलेला लोकांचा विश्वास लोककल्याणाच्या कामी कसा येईल, हे सूत्रही ‘लोकमान्य सोसायटी’ने कायम जपले आहे. लोक किंवा ग्राहक हाच ‘लोकमान्य’चा सदैव केंद्रबिंदू राहिला आहे. केवळ वित्तीय संस्थांचे जाळे उभारणे वा नफा कमाविणे, हा संस्थेचा उद्देश कधीच नव्हता आणि नाही. समाजाला बळ देणे, लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना सशक्त करून समृद्ध करणे, आर्थिक भरभराटीसाठी सक्षम करणे, लोकांना शिक्षणासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आधुनिक व तंत्रज्ञानपूर्ण वैद्यकीय सुविधांद्वारे लोकांचे जीवन निरामय बनविणे, व्यावसायिक विविधतेद्वारे आर्थिक उपक्रमांच्या माध्यमातून लोककल्याणासाठी काम करणे, हे संस्थेचे लक्ष्य आहे.

लोककल्प फाउंडेशनचे लोककल्याणकारी कार्य

लोकमान्य सोसायटीच्या विचार, धोरण आणि कृतीमधून ते कायमच उमटत आले आहे. याच शुद्ध हेतूने ‘लोककल्प फाउंडेशन’ही चालविले जाते. त्या माध्यमातून ग्रामविकास, पर्यावरण, वनीकरण, शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणावर अधिककरुन भर दिला जात आहे. लोकमान्य समूहाने गोवा-कर्नाटक सीमाभागातील कणकुंबी व जांबोटी परिसरातील तीसहून अधिक गावे ग्रामविकास प्रकल्पांतर्गत दत्तक घेतली आहेत. गावातील नागरिकांच्या पर्यायाने गावाच्या उपन्नवाढीसाठी या गावांतील बचत गट व महिलांना उपन्नवाढीसाठी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गावकऱ्यांना मिळतं प्रशिक्षण

लोककल्प गावातील महिलांना एकत्र करुन त्यांना अर्थसाक्षर होण्यासाठी प्रेरीत करतात. आत्मनिर्भर बनत स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन, प्रशिक्षण लोककल्पतर्फे मिळतं. याशिवाय लोककल्पअंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून महिलांना तसेच शेतकऱ्यांना अर्थसाक्षरतेबरोबरच त्यांनी निर्मिती केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता उत्तम दर्जाची कशी असेल, याबाबत प्रशिक्षणापासून ते वस्तूंचे मार्केटिंग व त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात.

आरोग्याचे भान

याशिवाय लोककल्पकडून आरोग्य क्षेत्रातही लोकहिताचे उपक्रम राबविले जात आहेत. लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरुक राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे केले जाते. याअनुषंगाने वेळोवेळी गावांमध्ये आरोग्य शिबिरे भरवली जातात. यायोगे त्यांना आपले आरोग्य योग्य राखण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या जातात. नेत्रदान, रक्तदान शिबिरे, हाडांची ठिसूळता तपासणी शिबिरे व संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर असे उपक्रम ‘लोकमान्य’कडून नित्यनेमाने आयोजित करण्यात येतात.

लोकमान्य डिजिटल

‘लोकमान्य डिजिटल’ने विविध आकर्षक व ग्राहककेंद्रित गुंतवणूक मुदत ठेवींच्या योजनांसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एकाच छताखाली ठेवीदार सभासदांना बहुउद्देशीय सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया धोरणाचा एक भाग म्हणून ‘लोकमान्य डिजिटल’ नावाने एक बहुउद्देशीय अॅप तयार केले आहे. या मोबाईल अॅपची कार्यप्रणाली इतर बँकांप्रमाणेच आहे. शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हे अॅप बनविण्यात आले आहे. ज्यात डिजिटल मोबाईल अॅप, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, फॉरेन एक्स्चेंज, युटिलिटी बिल पेमेंट, मोबाईल डीटीएच रिचार्ज, व्रेडिट कार्ड बिल पेमेंट आदी सेवांचा यात समावेश आहे. ठेवीदार सभासदांना याचा लाभ घेता येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहककेंद्रित सुविधा उपलब्ध करून देताना लोकमान्य सोसायटीने एकेक पाऊल पुढे टाकत मोठा पल्ला गाठला आहे.

सागर जावडेकर

Advertisement
Tags :

.