भारतावर विजयाचा ‘अभिषेक’
इंग्लंडवर दणदणीत विजय : अभिषेक शर्माची 34 चेंडूत 79 धावांची खेळी : सामनावीर वरुणचे 3 बळी
वृत्तसंस्था/ कोलकाता
येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या पहिल्याच टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना सामनावीर वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ 132 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर टीम इंडियाने विजयासाठीचे 133 धावांचे माफक लक्ष्य अवघ्या 12.5 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. अभिषेक शर्माने तुफानी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. अभिषेकने यावेळी वादळी फलंदाजी करताना 34 चेंडूंत पाच चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर 79 धावांची धावांची दमदार खेळी साकारली. या विजयासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 25 रोजी चेन्नई येथे खेळवण्यात येईल.
इंग्लंडच्या 133 धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने टीम इंडियाला वादळी सुरुवात करून दिली. संजूने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेताना 20 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 26 धावा केल्या. संजू बाद झाल्यावर फलंदाजीला आला तो सूर्यकुमार यादव. सूर्याकडून यावेळी भारताला मोठ्या आशा होत्या. पण सूर्याला भोपळाही फोडता आला नाही. भारताला एकामागून एक दोन धक्के बसले होते. पण त्यानंतर अभिषेक शर्माने संघाला सावरले.
अभिषेकचे तुफानी अर्धशतक
अभिषेक शर्माने यावेळी तिलक वर्माच्या साथीने दमदार फलंदाजी करायला सुरुवात केली. अभिषेकने इंग्लिश गोलंदाजांची धुलाई करताना अवघ्या 34 चेंडूत 79 धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने 5 चौकार व 8 षटकार लगावले. तिलक वर्माने 3 चौकारासह नाबाद 19 धावा करत त्याला चांगली साथ दिली. अभिषेक व तिलक वर्माच्या या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विजयासाठीचे लक्ष्य 12.5 षटकांतच पूर्ण करत सामना जिंकला.
इंग्लिश फलंदाजांची हाराकिरी
ईडन गार्डन्स स्टेडियमवर टीम इंडियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत पाहुण्या इंग्लंडला अवघ्या 132 धावांत गुंडाळण्याची किमया केली. डावातील पहिल्याच षटकांत फिल सॉल्टला अर्शदीपने बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंत पुढील षटकांत बेन डकेटला अर्शदीपनेच पॅव्हेलियनमध्ये माघारी पाठवले. डकेटला 4 धावा करता आल्या. यानंतर कर्णधार बटलर व हॅरी ब्रुकने 48 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, ब्रुकला वरुण चक्रवर्तीने बाद करत टीम इंडियाला तिसरे यश मिळवून दिले. ब्रुकने 17 धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेल्याने त्यांना मोठी धावसंख्या उभी करता आली नाही.
बटलरचे शानदार अर्धशतक
दुसरीकडे, कर्णधार बटलरने मात्र आक्रमक खेळताना सर्वाधिक 44 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 68 धावांचे योगदान दिले. बटलरच्या या शानदार खेळीमुळे इंग्लंडला शतकी मजल मारता आली. जोफ्रा आर्चरने 12 तर आदिल रशीदने नाबाद 8 धावा केल्या. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 23 धावांत 3 बळी घेतले. अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या व अक्षर पटेलने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 20 षटकांत सर्वबाद 132 (जोस बटलर 68, हॅरी ब्रुक 17, जोफ्रा आर्चर 12, रशीद नाबाद 8, अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल प्रत्येकी दोन बळी, वरुण चक्रवर्ती तीन बळी).
भारत 12. 5 षटकांत 3 बाद 133 (संजू सॅमसन 26, अभिषेक शर्मा 34 चेंडूत 79, सूर्या 0, तिलक वर्मा नाबाद 3, हार्दिक पंड्या नाबाद 3)
अर्शदीपचा जलवा, चहलला मागे टाकत ठरला टीम इंडियाचा नंबर 1 गोलंदाज
इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगने 17 धावांत 2 बळी घेतले. या कामगिरीसह तो भारतासाठी सर्वाधिक टी- 20 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अर्शदीपने प्रथम फिल सॉल्टला बाद केले. यानंतर त्याने बेन डकेटची विकेट घेतली. अर्शदीपने चहलसह अनेक गोलंदाजांना मागे टाकले आहे. भारताकडून सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर होता. चहलने 80 सामन्यांमध्ये 96 विकेट्स घेतल्या आहेत. पण आता अर्शदीपने त्याला मागे टाकताना अवघ्या 61 सामन्यात 97 बळी मिळवले आहेत.
भारताकडून सर्वाधिक टी 20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज
- अर्शदीप सिंग - 97 विकेट्स
- युजवेंद्र चहल - 96 विकेट्स
- हार्दिक पंड्या - 91 विकेट्स
- भुवनेश्वर कुमार - 90 विकेट्स
- जसप्रीत बुमराह - 89 विकेट्स