अभिषेक शर्माचे बारा चेंडूत अर्धशतक
पंजाबचा बंगालवर 112 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ हैदराबाद
सय्यद मुस्ताक अली चषक टी-20 स्पर्धेतील क गटातील रविवारी येथे झालेल्या सामन्यात सलामीचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने 12 चेंडूत जलद अर्धशतक झळकाविले. तसेच त्याने 52 चेंडूत 148 धावांची वेगवान खेळी केल्याने पंजाबने बंगालचा 112 धावांनी दणदणीत पराभव केला.
मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली बंगाल संघाला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. अभिषेक शर्माने आपल्या खेळीमध्ये 16 षटकारांचा पाऊस पाडला. टी-20 प्रकारामध्ये अभिषेक शर्माचे हे तिसऱ्या क्रमांकाचे संयुक्त जलद अर्धशतक आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 5 बाद 310 धावा जमविल्या. त्यानंतर बंगालने 20 षटकात 9 बाद 198 धावांपर्यंत मजल मारली. बंगाल संघातील अभिमन्यू ईश्वरनने 8 षटकार आणि 13 चौकारांसह 66 चेंडूत साकारलेली 130 धावांची खेळी वाया गेली. टी-20 प्रकारात सर्वाधिक षटकार मारणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. यापूर्वी मिझोराम विरुद्ध झालेल्या सामन्यात पुनित बिस्तने 17 षटकार नोंदविले होते.
पंजाबच्या डावामध्ये प्रभसिमरन सिंगने 35 चेंडूत 70 धावा जोडपल्या. अभिषेक शर्माने मोहम्मद शमी, आकाशदीप, चटरजी व शहाबाद अहमद यांची गोलंदाजी झोडपून काढली. हैदराबादच्या उपल स्टेडियमवर गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेतील सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध अभिषेक शर्माने 55 चेंडूत 141 धावा झोडपल्या होत्या. बंगाल विरुद्धच्या सामन्यात त्याने षटकामध्ये 15 धावा घेतल्या. मोहम्मद शमीने आपल्या 4 षटकात 61 धावांत 1 गडी तर आकाशदीपने 4 षटकात 55 धावांत 2 तर चौधरीने 35 धावांत 1 बळी मिळविला. चटरजीने आपल्या 4 षटकात 67 धावा दिल्या. अभिषेक शर्माने 12 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. चालू वर्षीच्या क्रिकेट हंगामात 25 वर्षीय अभिषेक शर्माने टी-20 प्रकारात यापूर्वी स्वत:च नोंदविलेला विक्रम मागे टाकला.
सय्यद मुस्ताक अली क्रिकेट स्पर्धेतील पंजाबची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत झालेल्या सिक्कीम संघाविरुद्ध बडोदा संघाने 20 षटकात 5 बाद 349 धावा झळकाविल्या होत्या. टी-20 प्रकारात साहिल चौहानने गेल्या वर्षी इस्टोनिया संघाकडून खेळताना सायप्रस विरुद्ध 27 चेंडूत जलद शतकाचा विक्रम नादविला असून तो अद्याप अबाधित राहिला आहे. रविवारच्या या सामन्यामध्ये अभिषेकने 32 चेंडूत शतक पूर्ण केले. अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग यांनी सलामीच्या गड्यासाठी 13 षटकात 205 धावांची द्विशतकी भागिदारी केली. या सामन्यात बंगालच्या डावामध्ये पंजाबच्या हरप्रित ब्रारने 23 धावांत 4 गडी बाद केले. बंगाल संघातील आकाशदीपने 7 चेंडूत 31 धावा झोडपल्या. बंगालच्या डावामध्ये ईश्वरन आणि आकाशदीप या दोन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली.
संक्षिप्त धावफलक - पंजाब 20 षटकात 5 बाद 310 (अभिषेक शर्मा 148, प्रभसिमरन सिंग 70), बंगाल 20 षटकात 9 बाद 198 (अभिमन्यू ईश्वरन 130, हरप्रित ब्रार 4-23).