रामनवमीला रामलल्लांवर सूर्यकिरणांचा अभिषेक
दुपारी 12:16 वाजता : पहाटे साडेतीन वाजल्यापासून दर्शन
वृत्तसंस्था/ अयोध्या
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता पहिला रामनवमीचा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी अयोध्येत भव्यदिव्य तयारी सुरू आहे. या सोहळ्याच्या नियोजनाला अंतिम स्वरुप देण्यासाठी राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा अयोध्येत पोहोचले आहेत. याचदरम्यान उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी सुसंवाद साधला. यावेळी रामनवमीच्या दिवशी 17 एप्रिल रोजी दुपारी 12:16 वाजता सुमारे पाच मिनिटे सूर्यकिरण प्रभू रामलल्लावर पडतील, असे त्यांनी सांगितले.
रामनवमीच्या दिवशी होणारा सूर्यकिरणांचा अभिषेक यशस्वी करण्यासाठी तांत्रिक व्यवस्था करण्यात येत आहे. सूर्यकिरणे रामलल्लाच्या मूर्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. यावर ट्रस्टचे पदाधिकारी विविध तज्ञांच्या मदतीने एकत्रितपणे काम करत आहेत. किरणोत्सव यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञही मेहनत घेत आहेत.
रामनवमी सोहळ्याच्या तयारीबाबत सोमवारी ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. अयोध्येत रामलल्ला विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या सोहळ्यावेळी अलोट गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केल्याचे राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले. भाविकांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातील असा विश्वास जिल्हा प्रशासन आणि राम मंदिर ट्रस्टला आहे. तसेच रामनवमीच्या मुहूर्तावर येणाऱ्या भाविकांना सोईस्कर पद्धतीने प्रभू रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. भाविकांसाठी असलेल्या सुविधा केंद्राचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे. मंदिराचे उर्वरित बांधकाम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण केले जाईल. अयोध्येत येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, याचीही काळजी घेतली जात असल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट केले.
भाविकांनी गोंधळ टाळावा
रामनवमी उत्सवाच्या तयारीची माहिती देताना श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, रामनवमीच्या दिवशी म्हणजेच 17 एप्रिलला रामलल्लाच्या दर्शनाचा कालावधी बदलला जाईल. मंगल आरतीनंतर पहाटे साडेतीन वाजल्यापासून ब्रह्म मुहूर्तावर अभिषेक, श्रृंगार आणि दर्शन एकाचवेळी करता येईल. पहाटे 5:00 वाजता श्रृंगार आरती होईल. श्री रामलल्लाचे दर्शन व सर्व पूजाविधी एकाचवेळी सुरू राहतील. देवाला नैवेद्य अर्पण करताना ठराविक वेळी अल्प कालावधीसाठी पडदा असेल. पडदा बंद असताना भाविकांनी धीर धरून श्रीरामाचे नामस्मरण करत राहावे आणि प्रभूची पूजा करावी. रात्री 11.00 वाजेपर्यंत दर्शनाचा क्रम यथास्थितीनुसार चालणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
19 एप्रिलपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
चालू आठवड्यात भाविकांचा ओघ वाढण्याची शक्यता गृहीत धरून सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन 19 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. रामनवमीनंतर आणखी पुढील दोन दिवस सुगम दर्शन पास, व्हीआयपी दर्शन पास, मंगला आरती पास, बांगर आरती पास आणि शयन आरती पास जारी केले जाणार नाहीत, असे ट्रस्टने जाहीर पेले आहे. श्री रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण अयोध्या महानगरपालिका क्षेत्रातील जवळपास 80 ते 100 ठिकाणी एलईडी दिव्यांद्वारे केले जाईल. स्क्रीनवर दाखवले जाईल. हे कार्य प्रसार भारतीच्या वतीने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आले आहे. तसेच थेट प्रक्षेपणही उपलब्ध होणार आहे.