अभिषेक-दीपशिखा, ज्योती वेन्नम यांना सुवर्ण
आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप : कंपाऊंडमध्ये पृथिका प्रदीप, पुरुष संघाला रौप्य
वृत्तसंस्था/ढाका, बांगलादेश
ज्योती सुरेखा वेन्नम कंपाऊंड तिरंदाजीत आघाडीवर राहत सहकाऱ्यांसह शानदार प्रदर्शन करीत येथे सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताला 3 सुवर्ण व दोन रौप्यपदके मिळवून दिली. ज्योतीने महिलांच्या वैयक्तिक व सांघिक विभागात सुवर्णपदके पटकावली. तिने प्रथम दीपशिखा व पृथिका प्रदीप यांच्यासमवेत कोरियाच्या महिला कंपाऊंड संघावर अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत 236-234 असा पराभव करून सुवर्ण मिळविले. त्यानंतर वैयक्तिक कंपाऊंडमध्ये ज्योतीने अंतिम फेरीत आपलीच सहकारी पृथिका प्रदीपचा 147-145 असा पराभव करीत सुवर्ण घेतले. त्याआधी उपांत्य लढतीत ज्योतीने चिनी तैपेईच्या सि यु चेनविरुद्ध केवळ एक गुण गमवित 149-143 असा विजय मिळविला.
17 वर्षीय पृथिकाने यजमान बांगलादेशच्या कुलसुम अख्तरचा 146-145 असा केवळ एका गुणाने पराभव केला होता. मिश्र कंपाऊंड विभागात अभिषेक वर्मा व दीपशिखा यांनी बांगलादेश जोडीचा 153-151 असा पराभव करून भारताला आणखी एक सुवर्ण मिळवून दिले. मात्र पुरुषांच्या कंपाऊंड अंतिम लढतीत भारताच्या पुरुष संघाला कझाकस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कझाकने ही लढत 230-229 अशा गुणांनी जिंकत सुवर्ण पटकावले. अभिषेक वर्मा, साहिल राजेश जाधव, प्रथमेश फुगे यांना या अंतिम लढतीत कझाकच्या दिलमुखामेत मुसा, बुनियोद मिर्झामेतोव्हृ आंद्रे ट्युट्युन यांच्याकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला.