अभिषेकला झाला खडतर सरावाचा फायदा
वृत्तसंस्था / सिडनी
भारताच्या टी-20 संघातील सलामीचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने दर्जेदार फलंदाजीचा मंत्र अवगत करण्यासाठी गेल्या बऱ्याच दिवसांपासून खडतर सरावावर भर दिला होता. तसेच चिवट आणि दर्जेदार ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर मानसिक आणि तांत्रिक दृष्ट्या फलंदाजी करण्यासाठी स्वत:ला तयार केल्याने त्याला नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भरघोस यश मिळाले. या मालिकेत अभिषेक शर्मा ‘मालिकावीर’ ठरला.
25 वर्षीय अभिषेकने या मालिकेत 161.39 स्ट्राईक रेट राखत सर्वाधिक म्हणजे 163 धावा जमविल्या. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील शनिवारचा शेवटचा सामना मुसळधार पावसामुळे रद्द करावा लागला.
जगातील अव्वल आणि दर्जेदार वेगवान गोलंदाजांचा भरणा ऑस्ट्रेलियन संघाकडे अधिक असल्याने तसेच ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर त्यांच्या गोलंदाजीला समर्थपणे तोंड देण्यासाठी आपण खडतर सराव केला. त्याचप्रमाणे मानसिक आणि तांत्रिक दृष्ट्या पूर्ण तयारी केल्याचे अभिषेकने पत्रकारांशी बोलताना सांगितले. दर्जेदार क्रिकेट खेळावयाचा असेल तसेच संघाला आपल्याकडून अधिक लाभ देण्यासाठी मी अव्वल वेगवान गोलंदाजांच्या शैलीचा अभ्यास केला. आक्रमक आणि भेदक गोलंदाजीसमोर फलंदाजांचा सराव केल्याने मी माझ्या फलंदाजीत सुधारणा करु शकलो, असेही अभिषेकने म्हटले आहे. या मालिकेतील गेल्या तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा हुकमी वेगवान गोलंदाज हॅजलवूडच्या गैरहजेरीचा लाभ भारतीय संघाला अधिक मिळू शकला. टी-20 या अति जलद प्रकारामध्ये मला नैसर्गिक आणि आक्रमक फलंदाज करण्यासाठी संघ व्यवस्थापनाने पूर्ण स्वातंत्र्य दिल्याबद्दल अभिषेकने कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षकाचे आभार मानले आहेत. पुढील वर्षी म्हणजेच 2026 साली आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार असल्याचे या स्पर्धेसाठी आतापासूनच मी सराराववर अधिक भर देणार आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने या मालिकेनंतर भारतीय संघाचे खास कौतुक आणिस्तुती केली आहे. महत्त्वाच्या क्षणी ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतीय संघाची कामगिरी अधिक सरस झाल्याची कबुली मार्शने दिली आहे. आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात होत असल्याने त्याचा लाभ भारतीय संघाला अधिकच होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. सध्या ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दर्जेदार संघ असून आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला जेतेपदासाठी अधिक झगडावे लागेल, अशी प्रतिक्रिया कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली आहे.