अभिमन्यू ईश्वरनचे नाबाद शतक, शेष भारत 4/289
ऋतुराज गायकवाड, इशान किशन फ्लॉप : मुंबईच्या 537 धावा : तापामुळे शार्दुल ठाकुर रुग्णालयात
वृत्तसंस्था/ लखनौ
येथील एकाना स्टेडियमवर मुंबई आणि ‘रेस्ट ऑफ इंडिया’ यांच्यात इराणी चषकाचा सामना खेळवला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. गुरुवारी (3 ऑक्टोबर) मुंबईचा पहिला डाव 537 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात ‘रेस्ट ऑफ इंडियाने 74 षटकांत 4 गडी गमावून 289 धावा केल्या. संघ अजूनही 248 धावांनी मागे आहे. मुंबईसाठी सरफराज खानने मॅरेथॉन खेळी खेळली. तो द्विशतक झळकावल्यानंतर नाबाद राहिला. तर ‘रेस्ट ऑफ इंडियासाठी अभिमन्यू ईश्वरनने धावांचा पाऊस पाडला. दिवसअखेरीस अभिमन्यू नाबाद 151 व ध्रुव जुरेल 30 धावांवर खेळत आहेत.
गुरुवारी 9 बाद 536 धावसंख्येहून पुढे खेळताना मुंबईचा पहिला डाव फार काळ टिकला नाही. शेवटची विकेटही अवघ्या एका धावेनंतर पडली. मोहम्मद जुनैद खान खाते न उघडता बाद झाला. सरफराज खान एका टोकाला नाबाद राहिला. त्याने 286 चेंडूंत 25 चौकार आणि 4 षटकारांसह 222 धावा केल्या. रेस्ट ऑफ इंडियाकडून मुकेश कुमारने पाच बळी घेतले. तर यश दयाल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
अभिमन्यूचा शतकी धमाका
रेस्ट ऑफ इंडियाची सुरुवात खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड 9 धावा करुन माघारी परतला. तर साई सुदर्शनला 32 धावाच करता आल्या. देवदत्त पडिक्कलने 16 धावांचे योगदान दिले. स्टार खेळाडू इशन किशनही अवघ्या 38 धावा काढून तंबूत परतला. दुसरीकडे, अभिमन्यू इश्वरनने मात्र एका बाजूने संघाचा किल्ला लढवला. त्याने प्रथम श्रेणीतील 26 वे शतक झळकावताना संघाला पावणेतीनशेपर्यंत मजल मारुन दिली. अभिमन्यूने 212 चेंडूत 12 चौकार व 1 षटकारासह नाबाद 151 धावांची खेळी साकारली. अभिमन्यूने या खेळीसह शतकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याने नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील सामन्यांमध्ये शतक केले होते. त्याला ध्रुव जुरेलने 41 चेंडूत 30 धावा करत चांगली साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी साकारली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रेस्ट ऑफ इंडियाने 74 षटकांत 4 गडी गमावत 289 धावा केल्या होत्या. ईश्वरन 151 तर जुरेल 30 धावांवर खेळत होते. मुंबईकडून मोहित अवस्थीने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई पहिला डाव 141 षटकांत सर्वबाद 537
रेस्ट ऑफ इंडिया प.डाव 74 षटकांत 4 बाद 289 (ऋतुराज गायकवाड 9, अभिमन्यू ईश्वरन नाबाद 151, साई सुदर्शन 32, इशान किशन 38, जुरेल नाबाद 30, मोहित अवस्थी 2 बळी, तनुष कोटियन व मोहम्मद खान प्रत्येकी एक बळी).
मुंबईचा शार्दुल ठाकुर रुग्णालयात दाखल
वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर इराणी कप सामन्यादरम्यान आजारी पडला. बुधवारी रात्री त्याला खूप ताप आला. त्यानंतर शार्दुलला लखनौतील मेदांता येथे दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयात त्याची मलेरिया आणि डेंग्यूची चाचणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल येणे बाकी आहे. विशेष म्हणजे, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी शार्दुल ताप येत असल्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये आराम करत होता. पण, मुंबईच्या लागोपाठ विकेट गेल्यामुळे द्विशतकवीर सरफराजला साथ देण्यासाठी तो मैदानात उतरला. त्याने 36 धावांची खेळी साकारली.