Vari Pandharichi 2025: साधन तें सार पंढरीची वारी | आन तुं न करी सायासाचें ||
ज्ञानेश्वर माऊलींनी ललित अंगाने हे खूप सुंदर सांगितले आहे.
By : ह.भ.प. अभय जगताप
सासवड :
साधन तें सार पंढरीची वारी | आन तुं न करी सायासाचें ||
वेद तो घोकितां चढे अभिमान । नाडेल तेणें जाण साधन तें ।।
शास्त्रमतवाद कासया पसार । करी सारासार वारी एक ।।
पुराण सांगतां मन वेडावलें । निंदुं जें लागलें आणिकांसी ।।
ग्रंथ पाहावें तरी आयुष्य क्षणीक । व्यर्थ खटपट करुनी काई ।।
एका जनार्दनीं सारांचे पैं सार । विठ्ठल त्रिअक्षर जप करी ।।
अभंगांमध्ये संत एकनाथ महाराजांनी आपल्या परंपरेमध्ये असलेल्या काही साधनांचा विचार केला आहे आणि या साधनांपेक्षा नामस्मरण आणि वारी ही साधना आपल्यासाठी योग्य आहे, असा निष्कर्ष काढला आहे. सर्व साधनांचे सार म्हणजे पंढरीची वारी आहे आणि आता हे सार आपल्या हातात असल्यामुळे इतर कष्टाची साधने करण्याची आवश्यकता नाही.
इतर साधने कष्टप्रद आहेतच. पण शिवाय त्यामध्ये काही धोके आहेत. वेदपठण या मार्गाचा विचार केला तर वेद पठणाने अभिमान निर्माण होतो, असे नाथ महाराजांचे तत्कालीन निरीक्षण आहे. वेदशास्त्र संपन्न व्यक्तीला त्या काळात फार मान मिळत होता. ज्ञान आणि त्या ज्ञानाची जाणीव यामुळे अभिमान वाढतो. ज्ञानेश्वर माऊलींनी ललित अंगाने हे खूप सुंदर सांगितले आहे. माऊली म्हणतात,
‘नवल अहंकाराची गोठी ।
विशेषें न लगे अज्ञानापाठीं ।
सज्ञानाचे झोंबे कंठीं ।
नाना संकटीं नाचवी ।
व्यवहारात अज्ञानी, अडाणी माणसाला फसवले जाते. पण अहंकार मात्र अज्ञान्याच्या मागे लागत नाही. तो ज्ञानी माणसालाच संकटात टाकतो म्हणजे थोडक्यात अहंकार हा ज्ञानी माणसालाच होऊ शकतो. तर वेदपठणाने अशाप्रकारे अहंकार निर्माण होतो. त्यामुळे ते साधन त्रासदायक होते. आपल्याकडे सहा शास्त्रं आहेत. या सहा शास्त्रांनी वेगवेगळे निष्कर्ष काढले आहेत.
त्यामुळे या पसाऱ्यात पडण्यापेक्षा वारी करणे चांगले. पुराणातील विविध चमत्कारिक कथा, प्रसंगी परस्पर विरोधी उपदेश यामुळे मन वेडावून जाते. शिवाय आपल्याकडे याशिवायही अनेक ग्रंथ आहेत. पण एका आयुष्यात माणूस अभ्यास तरी किती करणार. त्यामुळे नाथ महाराज म्हणतात की या सर्व साधनांचे सार म्हणजे विठ्ठलाचे नाव आहे. हे नाव घेत, गात त्याच्याकडे जायचं म्हणजेच पंढरीची वारी. म्हणून वारी हे श्रेष्ठ साधन आहे.