आभा खटुआचा नवा राष्ट्रीय विक्रम
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथे सुरु असलेल्या फेरडेशन चषक राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी महिलांच्या गोळाफेक प्रकारात महाराष्ट्राच्या आभा खटुआने सुवर्णपदकासह नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला.
आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारी आभा खटुआने फेडरेशन चषक स्पर्धेतील महिलांच्या गोळाफेकमध्ये 18.41 मी. ची नोंद करत सुवर्णपदक हस्तगत केले. तर तिने या क्रीडा प्रकारात नोंदविलेला मनप्रित कौरचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या पण सध्या महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारी आभा खटुआने यापूर्वी मनप्रित कौरसमवेत या क्रीडाप्रकारात 18.06 मी. चा संयुक्त राष्ट्रीय विक्रम केला होता. तिने हा विक्रम मागे टाकला आहे. पण तिला 18.80 मी. ऑलिम्पिक पात्रता मर्यादा गाठता आली नाही. आतापर्यंत एकाही भारतीय महिला स्पर्धकाला या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिक पात्रता फेरीपर्यंत मजल मारता आलेली नाही. पॅरिस ऑलिम्पिकसाठी शेवटची पात्रता फेरी स्पर्धा 30 जूनला होणार आहे. फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या गोळाफेक प्रकारात उत्तरप्रदेशच्या किरण बलियानने 16.54 मी. चे अंतर नोंदवित रौप्यपदक तर दिल्लीच्या सृष्टी विगने 15.86 मी. चे अंतर नोंदवित कांस्यपदक मिळविले.
पुरूषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत ओडिशाच्या अनिमेश कुजूरने 20.62 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक घेतले. आंध्र प्रदेशच्या एन. शणमुगाने या क्रीडा प्रकारात रौप्य तर महाराष्ट्रच्या जय शहाने कांस्यपदक पटकाविले.