जपानमध्ये आबेंचा पक्ष बहुमतापासून वंचित
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) आघाडीला संसदेत बहुमत मिळवता आलेले नाही. शिंजो आबे यांच्या पक्ष एलडीपीला केवळ 191 जागा मिळाल्या असून 65 जागा कमी झाल्या आहेत. गेल्या 15 वर्षातील पक्षाची ही सर्वात वाईट कामगिरी आहे. एलडीपी आणि त्याचा मित्रपक्ष कोमेटो यांना मिळून 215 जागा मिळाल्या आहेत. संसदेत एकूण 465 जागा असून सरकार चालवण्यासाठी युतीला 233 जागा मिळवाव्या लागतील. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी गेल्या महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. यानंतर इशिबा यांनी निवडणूक घेण्याची घोषणा केली होती.
2009 नंतर एलडीपीला बहुमत न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. एलडीपी नेते अनेक घोटाळ्यांमध्ये अडकल्यामुळे त्यांना बहुमत मिळण्यापासून वंचित रहावे लागल्याचा दावा तज्ञांकडून केला जात आहे. देशात एलडीपीची लोकप्रियता सतत घसरत चालली आहे. या वर्षाच्या सुऊवातीला, एलडीपीचे मंजूरी रेटिंग 20 टक्क्यांच्या खाली घसरले होते.