काब्रालांचा त्याग, सिक्वेरांची वर्णी!
नेतृत्वाच्या सूचनेनुसार काब्रालांचा मंत्रिपदाचा राजीनामा : नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा मंत्रीपदी शपथबध्द
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळात समावेश करण्यात आलेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी काल रविवारी सायंकाळी मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना देण्यात येणाऱ्या खात्यासंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही, तो लवकरच घेण्यात येईल, असे शपथविधी नंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तत्पूर्वी सकाळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार नीलेश काब्राल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सायंकाळी 7 वाजता राजभवनवर झालेल्या छोटेखानी सोहळ्यात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मुख्य सचिव परिमल राय यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनपूर्ती
केंद्रातील श्रेष्ठींच्या आदेशानुसार साबांखामंत्री नीलेश काब्राल यांनी रविवारी सकाळी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर केल्यामुळे सदर पद रिक्त झाले होते. त्यावर सिक्वेरा यांची वर्णी लावण्यात आली. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आठ आमदारांमध्ये सिक्वेरा यांचा समावेश होता. त्यावेळी त्यांना मंत्रीपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. बऱ्याच दीर्घ काळानंतर का होईना, अखेर रविवारी त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करून मुख्यमंत्र्यांनी त्या आश्वासनाची पूर्तता केली आहे.
या छोटेखानी सोहळ्यास सौ. पिल्लई, सभापती रमेश तवडकर, केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे मंत्रीगण विश्वजित राणे, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, माविन गुदिन्हो, रोहन खंवटे, नीळकंठ हळर्णकर, गोविंद गावडे, यांच्यासह आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, दिव्या राणे, चंद्रकांत शेट्यो, ज्योशुआ डिसोझा, आलेक्स रेजिनाल्ड, ऊडाल्फ फर्नांडीस, प्रेमेंद्र शेट यांची उपस्थिती होती. अन्य मान्यवरांमध्ये माजी आमदार दामू नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर आणि आलेक्स सिक्वेरा यांचे कुटुबीय आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य सचिव श्री. राय यांनी सोहळ्याची सूत्रे सांभाळली. सिक्वेरा यांनी इंग्रजीतून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून सिक्वेरा यांचे स्वागत केले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी सिक्वेरा यांचा नुकताच शपथविधी झालेला आहे, असे सांगताना सध्यातरी मंत्रीमंडळात अन्य कोणताही बदल करण्याची घाई नसल्याचे एका प्रश्नावर स्पष्ट केले. सिक्वेरा यांना लवकरच खात्यांचे वाटप करण्यात येईल, व येणाऱ्या काळात श्रेष्ठींच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
काब्राल यांच्या राजीनाम्यात भ्रष्टाचाराचा संबंध नाही
कुडचडेचे आमदार तथा सार्वजनिक बांधकामंमत्री नीलेश काब्राल हे भाजपचे दीर्घकाळ मुख्य सदस्य आहेत. पक्षाच्या हितासाठी आणि केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचे आपण समर्थन करतो. राजनामा घेताना कोणत्याही स्वऊपाच्या भ्रष्टाचाराचा त्यामध्ये संबंध नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. काब्राल हे पक्षाचे प्रमुख सदस्य असून ते सुऊवातीपासून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मंत्री म्हणूनही त्यांना कार्य करण्यास संधी मिळालेली आहे. म्हणून त्यांना त्याग करण्यास सांगितले आहे. त्यानुसार काब्राल यांनीही केंद्र व राज्य सरकारची विनंती मान्य करुन राजीनामा दिला आहे. साबांखा नोकरभरती घोटाळा, भ्रष्टाचाराच्या आरोपांशी या निर्णयाचा काहीही संबंध नाही. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला यापुढेही होत राहणार आहे. त्यांना केंद्रीय नेतृत्व व राज्य सरकार यांचा नेहमीच पाठिंबा राहील, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
पद महत्वाचे नव्हे, पक्षाचा निर्णय सर्वोच्च : काब्राल
केंद्रीय नेतृत्वाने आपणास बोलावून घेऊन सांगितले की तुम्ही त्याग करून राजीनामा द्या. म्हणून आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत. कारण आपल्यासाठी पद महत्त्वाचे नसून, पक्षाचा निर्णय सर्वोच्च आहे. त्यामुळेच आपण राजीनामा दिला, असे आमदार नीलेश काब्राल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पर्वरी येथील सचिवालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या 8 आमदारांना भाजपने दिलेली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी हा निर्णय केंद्राने घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यामुळेच आपण राजकारणात आलो. त्यामुळे आपल्यासाठी हे पद कधीच महत्त्वाचे नव्हते, केंद्राचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. काब्राल म्हणाले. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी स्वीकारून आपल्या मतदारसंघासाठी काम करत राहीन. गेल्या 16 वर्षांपासून आपण पक्षासोबत आहे. आपणास आतापर्यंत दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. यापुढेही पक्षाच्या कामाला आपण झोकून देणार आहे. पक्षही आपल्या पाठीशी यापुढे ठामपणे उभा राहील, असा विश्वास आपणास आहे, असेही काब्राल यांनी सांगितले.
सावंतांच्या सरकारातून मंत्रीपद सोडावे लागलेले सहावे आमदार
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या एकंदरीत कारकिर्दीत मंत्रीपदावर पाणी सोडावे लागणारे नीलेश काब्राल हे सहावे आमदार ठरले आहेत. मागील 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रीपद सोडणारे ते पहिले आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यावर 2019 मध्ये सावंत मुख्यमंत्री झाले. नंतर त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे 3 तत्कालीन मंत्री विजय सरदेसाई, जयेश साळगांवकर, विनोद पालयेकर यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिला. मग अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आले. नंतर आमदार सुदीन ढवळीकर यांचे मंत्रीपद काढून घेण्यात आले. म्हणजे एकूण 5 मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता काब्राल हे सहावे ठरले आहेत.