चोर्लाजवळ घाटमाथ्यावर बेवारस अवस्थेत उभी ट्रक
वार्ताहर/कणकुंबी
बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील कर्नाटक हद्दीत घाटमाथ्यावर गेल्या दीड महिन्यापासून एक ट्रक बेवारस अवस्थेत थांबलेली असून यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोव्याहून कचरा घेऊन बेळगावच्या दिशेने येणारी(के. ए. 22-डी-3351) या क्रमांकाची ही ट्रक गेल्या महिना ते दीड महिन्यापासून बेवारस अवस्थेत रस्त्याच्या बाजूला थांबविण्यात आली आहे. या मार्गावरून येणार जाणारे प्रवासी किंवा वाहनधारकांना ही ट्रक कुणाची व का थांबली आहे, असा प्रश्न करत आहेत. मात्र याविषयी कोणीही प्रशासनाला कळविलेले दिसत नाही. फक्त बघून पुढे जाणेच योग्य मानतात.
या ट्रक संदर्भात अद्याप कुणीही चौकशी केलेली दिसत नाही. पोलीस प्रशासन देखील याबाबतीत बेफिकीर आहे, असे वाटते. वास्तविक महिना ते दीड महिन्यापासून थांबलेल्या ट्रकची चौकशी पोलिसांनी करून बेवारस अवस्थेत असलेली ही ट्रक कुणाची आहे याचा शोध घेणे गरजेचे असताना पोलिसांनी अद्याप कोणतीही चौकशी केलेली दिसत नाही. या मार्गावरून अनेक अवजड वाहनांची ये-जा असते. गोव्याहून बेळगावच्या दिशेने कचरा घेऊन येणाऱ्या अनेक गाड्या आहेत. त्यापैकीच ही एक गाडी असावी, गाडीमध्ये कचरा भरून ताडपत्री झाकण्यात आली आहे. गेल्या महिन्या ते दीड महिन्यापासून थांबलेली ही ट्रक जैसे थे अवस्थेत असून यामागचे गौडबंगाल काय आहे, हे अनुत्तरीत आहे. ही ट्रक कोणाची व घाटात सोडून जाण्यामागे प्रयोजन काय असावे, असे तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.