अबकी बार...
लोकसभा निवडणुकीसाठी रणवाद्ये तर केव्हापासून वाजत आहेत. अनेक नेते रथारूढ झाले आहेत. आचारसंहिता लागू झाली आहे. काहींच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. काहींची नावे पक्की आहेत. पण, घोषणा बाकी आहेत. दरम्यान, राज ठाकरे दिल्लीत जाऊन भाजपा नेते अमित शहांना भेटून आले आहेत. भाजपाच्या महायुतीत आता चौथा भिडू सामील होणार हे स्पष्ट झाले आहे. राज्यात पवार विरोधी पवार, ठाकरे विरोधी ठाकरे अशी जुंपली आहेच. ती भाजपाच्या तेलाने अधिक भडकणार हे वेगळे सांगायला नको. येत्या चार पाच दिवसात लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. पण, वंचितचे प्रकाश आंबेडकर कुणाचा हात धरतात कुणाला तोंडावर पाडतात आणि त्यांची भूमिका कुणाला फायदेशीर ठरते हे स्पष्ट होताना दिसत नाही. कधी भीमशक्ती शिवशक्ती एकत्र म्हणतात कधी ठाकरे व पवार यांनी विश्वासार्हता गमावली म्हणतात कधी एमआयएम बरोबर हातमिळवणी करतात तर कधी काँग्रेससोबत जागा वाटपाच्या एकतर्फी घोषणा करतात. एकूणच महायुती असो वा महाआघाडी काही ठरले आहे काही सांगितले जाते आहे आणि बरेच ठरायचे आहे. शेवटी कार्यकर्ते व मतदार काम करणार वेगळेच चित्र असेल. जागा वाटपाची बोलणी म्हणजे चार मला चार तुला असे ठरवता येत नाही. नेत्यांनी काही ठरवले तरी कार्यकर्ते व मतदार तसे करतीलच असे नाही. तूर्त मोदी समर्थक आणि मोदी व भाजप विरोधक असे चित्र दिसत असले तरी शेवटच्या क्षणी प्रत्येक मतदारसंघात राजकीय पक्षाचा आणि मतदारांचा वेगळा हिशोब असणार आहे. मोठ्या राष्ट्रीय पक्षांनी स्थानिक पातळीवर प्रादेशिक पक्षांना सोबत घेतले तर त्याचा लाभ होऊ शकतो पण, अनेक प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर त्यांचा प्रभाव केवळ त्यांच्या
पॉकेटपुरताच राहतो. भाजपाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार चारशे पार अशी घोषणा केली आहे. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी अजून जागावाटप व रणनिती याबद्दल म्हणावे तितके गंभीर नाहीत. त्यांची भारत जोडो यात्रा आता पूर्ण झाली आहे. या दरम्यान ममता
बॅनर्जीनी आपले सर्व उमेदवार जाहीर करून टाकले. नितीशकुमार इंडिया आघाडी सोडून भाजपासोबत गेले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेकडून रोज जागा वाटप पक्के झाले आहे असे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सांगत आहेत. पण, प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत खोटी माहिती देतात असा आरोप करत उद्धव ठाकरे व शरद पवार यांची विश्वासार्हता संपली आहे असे म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे यांना मानणारा राज्यात मतदार आहे तो थोडा आहे. पण, महाराष्ट्रात तो जिंकण्यासाठी उपयुक्त आहे. ओघानेच अंतिम चित्र निर्माण होण्यापूर्वी हे दोघे कुणासोबत जातात हे महत्त्वाचे. त्याच जोडीला शरद पवार प्रत्यक्षात बोलतात काय आणि करतात काय हे सांगणेही कठीण. ओघानेच अनेक ठिकाणी बंडखोरी होणार हे स्पष्ट आहे. सांगलीवर शिवसेनेने दावा केला आहे व कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांना उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. चंद्रहार पाटील हा मुळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या उमेदवारीला इंडिया आघाडीतून कोण हवा देत आहे हे उघड गुपीत आहे. पण, तसे झाल्यास सांगलीत काँग्रेस पक्ष वसंतदादांचे नाव घेऊन बंड करू शकते व तिहेरी लढत अटळ दिसते. ओघानेच वरवर आघाडी, युती अशी नावे असली तरी प्रत्यक्षात जागेवर काय होणार हे महत्त्वाचे व त्यामुळेच काँग्रेससारख्या एकावेळच्या बलाढ्या पक्षाला अबकी बार पचास पार असे थट्टेने म्हटले जाते आहे. गेल्यावेळी कोणा एकापक्षाला विरोधी नेता करावे असे संख्याबळ नव्हते. यावेळी आघाडीमुळे काय फरक पडतो ते बघायचे. उमेदवार इच्छुक यावर नजर टाकली तर तेच ते असेच चित्र दिसते आहे. निवडणूक ही आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्यात राहिलेली नाही पण, मतदार हुशार आहेत. कुणाला हवा द्यायची आणि कुणाला घरी बसवायचे यांचे पक्के ज्ञान त्याला आहे. महाराष्ट्रात आंदोलन म्हणून काही मतदार संघात प्रत्येक गावचा एक उमेदवार लोकसभेला उभा करणार असे सांगितले गेले होते तसे झाले तर ती मतप्रतिमा आणि तो मतदारसंघच आणि तेथील यंत्रणा याची खूप चर्चा व मोठी तारांबळ होईल. पण, प्रशासन सर्व गोष्टीला तयार असते व आता मतदान पत्रिकेऐवजी मतदार यंत्र असणार आहे. त्यामुळे मतदान करणे हीच कसोटी ठरेल. आचारसंहितेचा परिणाम दिसू लागला आहे. येत्या तीन चार दिवसातच होळी, धुळवड असे सण उत्सव आहेत. त्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. बी फॉर्म दिले जातील पण, अनेक पक्षांनी उमेदवारांच्या कानात काही हितगुज केले आहे. त्यामुळे यावेळी होळीलाही हवा तो रंग येऊ शकतो आणि रामनवमीला वेगळे महत्त्व येणार हे सांगावे लागत नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, आणि डावे, समाजवादी, भाजप विरोधी याना आपण या निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी करून काही साधू शकतो असे वाटते आहे. पण, मान्यवर संस्थांनी घेतलेल्या मतदार चाचण्यांचे निष्कर्ष वेगळेच आहेत. दिल्लीत आपची सत्ता असली तरी आपला लोकसभेची एकही जागा मिळणार नाही असे सांगितले जात आहे. काँग्रेसला विधानसभेला कर्नाटकात यश मिळेल असे वाटत असले तरी तेथील चाचणी सर्वेक्षण लोकसभेसाठी वेगळेच अंदाज व्यक्त करत आहे. त्यामुळेच अबकी बार पचास पार अशी काँग्रेसची थट्टा केली जात आहे. महाराष्ट्रात जागा वाटप कसे होते, उद्धव ठाकरे व शरद पवार याना पक्षफुटीनंतर कितपत सहानुभूती संघटीत करता येते यावर काही गोष्टी अवलंबून आहेत. पण, अजून जागा वाटप नाही, उमेदवार निश्चित नाहीत या पार्श्वभूमीवर लढत कशी होणार हे बघावे लागेल. भाजपाने राज ठाकरे याना सोबत घेतले तर त्यांचा टक्का तीन ते चार परसेंटने वाढू शकतो. राज ठाकरे मोठ्या सभा घेऊन इंडिया आघाडीची सालटी काढू शकतात आणि मुंबई महापालिकेत वेगळे चित्र दिसू शकते. भाजप आणि ठाकरे यांची बोलणी कशी होते याला महत्त्व आहे. पण, यानिमित्ताने बारामती जशी गाजते आहे तशी मुंबई गाजणार हे स्पष्ट आहे. शरद पवारांना विश्वासार्हता उरली नाही असे प्रकाश आंबेडकर सांगतात. होळी, धुळवड आणि निवडणुकीत हे चालणारच कुणी त्यांचे वाईट वाटून घ्यायचे नसते ही कर्माची फळे असतात आणि जशी प्रजा तसे त्यांना राजे भेटतात.