आयुषचा श्रीकांतला धक्का
उन्नती हुडा उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/तैपेई
भारताचे युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी व उन्नती हुडा यांनी तैपेई ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील प्रभावी प्रदर्शन पुढे चालू ठेवले उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आयुषने के.श्रीकांतला पराभवाचा धक्का दिला तर उन्नतीने चिनी तैपेईच्या लिन सिह युनचा पराभव केला. 20 वर्षीय आयुषने आपल्याच देशाच्या किदाम्बी श्रीकांतचा 21-16, 15-21, 21-17 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. श्रीकांत सध्या जागतिक क्रमवारीत 82 व्या स्थानावर आहे.
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपचा उपविजेता ली चिया हाओला चकित केले होते. या सामन्यातही त्याने अनुभवी खेळाडूसारखा खेळ करीत श्रीकांतचे आव्हान संपुष्टात आणले. त्याची उपांत्यपूर्व लढत कॅनडाच्या सातव्या मानांकित ब्रायन यांगशी होईल. महिला एकेरीत 2022 ओडिशा मास्टर्स व 2023 अबु धाबी मास्टर्सची चॅम्पियन असणाऱ्या उन्नती हुडाने लिन सिह युनचा 21-12, 21-7 असा केवळ 27 मिनिटांत फडशा पाडला. 17 वर्षीय उन्नतीची उपांत्यपूर्व लढत हंग यि टिंगशी होईल. तरुण मन्नेपल्लीला मात्र इंडोनेशियाच्या मोह झाकी उबेदिल्लाहकडून 13-21, 9-21 असा पराभव स्वीकारावा लागला.