आयुष शेट्टी, लक्ष्य, जॉर्ज, रक्षिता यांची आगेकूच
वृत्तसंस्था/ सारब्रुकेन (जर्मनी)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या 2025 च्या हायलो खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी, लक्ष्य सेन, किरण जॉर्ज आणि रक्षिता रमेश यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळविले.
सुपर 500 दर्जाच्या या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या सामन्यात भारताच्या 31 व्या मानांकित तसेच 20 वर्षीय आयुष शेट्टीने सिंगापूरच्या विश्वविजेत्या लोह यूचा 21-11, 21-11 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 34 मिनिटात फडशा पाडत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. चालू वर्षाच्या प्रारंभी झालेल्या अर्लीन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टीने येवला पराभूत केले होते. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने आपल्या देशाच्या शंकर सुब्रमनियनचा 21-14, 21-11 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. 17 व्या मानांकित लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना फ्रान्सच्या अॅलेक्स लेनिरशी होणार आहे. अन्य एका सामन्यात भारताच्या 38 व्या मानांकित किरण जॉर्जने केवळ 70 मिनिटांच्या कालावधीत फ्रान्सच्या 13 व्या मानांकित टोमा ज्युनियर पोपोव्हचे आव्हान 18-21, 21-18, 21-19 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत भारताच्या किरण जॉर्जने पहिल्याच फेरीत किदांबी श्रीकांतला पराभवाचा धक्का दिला होता.
महिलांच्या विभागात भारताच्या रक्षिताने आपल्या देशाच्या श्रीयांशी वालिशेट्टीचा 19-21, 21-8, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. रक्षिताचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना डेन्मार्कच्या सहाव्या मानांकित लिने ख्रिस्टोफर्सनबरोबर होईल.