‘आप’च राज्यघटनेचे रक्षण करणार
केजरीवालांचा पक्षस्थापना दिनी दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षचा 13 वा स्थापनादिन मंगळवारी साजरा झाला आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवालांनी संबोधित केले आहे. आम आदमी पक्षाच्या निर्मितीला 12 वर्षे झाली आहेत. राज्यघटना दिनीच एक नवा पक्ष उदयास आला हा योगायोग नाही. देवानेच आम आदमी पक्षाचे अस्तित्व निर्माण करविले आहे. राज्यघटना धोक्यात असून हाच पक्ष त्याचे रक्षण करेल असे देवालाही वाटले असावे असे उद्गार केजरीवालांनी काढले आहेत.
केजरीवालांनी यावेळी आप आमदारांना दररोज सफाई कर्मचाऱ्यांसोबत चहा-नाश्ता करण्याचे आवाहन केले आहे. माझ्या भागात जितके सफाई कर्मचारी राहतात, त्यांना आम्ही बुधवारी चहापानासाठी बोलावत आहोत. गुरुवारपासून सर्व आमदार आणि नगरसेवकांनी स्वत:च्या घरी सफाई कर्मचाऱ्यांना बोलवावे. त्यांच्यासोबत वेळ घालवावा आणि त्यांच्या समस्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असे केजरीवालांनी म्हटले आहे.
दिल्ली महापालिकेत सत्ता येऊन 2 वर्षे झाली आहेत. आमची सत्ता आल्यापासून पालिका कर्मचाऱ्यांना संप करावा लागलेला नाही. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगात जमा होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना आम्ही पक्के घर दिले असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.
भाजपचे लोक हे सुटी घालविण्याच्या प्रकाराप्रमाणे झोपडपट्ट्यांमध्ये जातात. भाजपच्या नेत्यांकडून गरीबांची चेष्टा केली जाते. मी स्वत:च्या आयुष्यातील 10 वर्षे झोपडपट्टीत घालविली आहेत. झोपडपट्टीवासीयांनी भाजपपासून सावध रहावे. भाजपचे नेते भविष्यात बुलडोझर घेऊनही येऊ शकतात असे केजरीवालांनी म्हटले आहे.