राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणार निवडणूक
20 डिसेंबर रोजी मतदान अन् निकाल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 6 रिक्त जागांवरील निवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना जारी केली आहे. 20 डिसेंबर रोजी राज्यसभेच्या 6 जागांकरिता मतदान होणार आहे. आंध्रप्रदेशच्या तीन, ओडिशा, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेकरिता ही निवडणूक होणार आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीकरिता 10 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 13 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.
हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यसभा निवडणुकीतदेखील विरोधी पक्षांची मोठी कसोटी लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला आहे.
ऑगस्ट महिन्यात वायएसआर काँग्रेसचे नेते वेंकटरमण राव, मोपीदेवी, बीधा मस्तान राव यादव आणि रयागा कृष्णैया यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून आंध्रप्रदेशसाठीच्या राज्यसभेच्या तीन जागा रिक्त आहेत. बीधा मस्तान राव यादव आणि रयागा कृष्णैया यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ 21 जून 2028 रोजी समाप्त होणार होता. तर मोपीदेवी यांचा कार्यकाळ 21 जून 2026 पर्यंत होता.
तर सुजीत कुमार यांच्या राजीनाम्यानंतर ओडिशात राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. सुजीत कुमार यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 पर्यंतचा होता. परंतु राजीनाम्यानंतर बिजू जनता दलाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
ऑगस्ट महिन्यात कोलकात्यातील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयात एका महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तृणमूल नेते जवाहर सरकार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. परंतु त्यांचा कार्यकाळ 2026 पर्यंत होता. आता या रिक्त जागेकरिता पोटनिवडणूक होणार आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप नेते कृष्णलाल पवार यांनी विजय मिळविल्यावर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता हरियाणाच्या या जागेकरिता पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आंध्रप्रदेशात तेदेप आणि ओडिशात भाजपचे राज्यसभा पोटनिवडणुकीतील पारडं जड असणार आहे.