महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चंदीगढमध्ये ‘आप’ उमेदवार महापौर! सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फेरमोजणी

06:11 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

पंजाब आणि हरियाणाची राजधानी असलेल्या चंदीगढच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची काही दिवसांपूर्वी झालेली निवड ही औटघटकेची ठरली आहे. त्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीची आठ मते अवैध ठरविण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मते वैध ठरवून नव्याने मतगणना करण्याचा आदेश दिल्यानंतर त्याच मतांची फेरगणना करण्यात आली. त्यात आम आदमी पक्षाचे कुलदीप कुमार हे निवडून आले आहेत.

Advertisement

तथापि, त्यांचे महापौरपद टिकू शकेल काय हा देखील कुतूहलाचा विषय झाला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देण्यापूर्वी दोन दिवस आम आदमी पक्षाच्या तीन नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे आता नगरसेवकांच्या संख्येच्या दृष्टीने चंदीगढ महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत आहे. मात्र, नव्या महापौरांच्या विरोधात सहा महिन्याच्या आत अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही, असा नियम असल्याचे विधीतज्ञांनी स्पष्ट केले आहे.

नाट्यामय घडामोडी

12 फेब्रुवारीला चंदीगढच्या महापौरपदासाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांची युती होती. या युतीकडे 20 नगरसेवकांचे संख्याबळ होते. त्यामुळे युतीचा महापौर होणार हे निश्चित मानले जात होते. तथापि. मतगणनेच्या वेळी युतीची आठ मते अवैध असल्याचे घोषित करण्यात आल्याने 17 मते मिळवून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सोनकर हे महापौर बनले होते. या मतगणनेला आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. निवडणूक अधिकारी मसीह यांनी आठ मतपत्रिका बिघडविल्याचा आरोप करण्यात आला होता. तसे व्हिडीओचित्रणही न्यायालयात सादर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकारावर सोमवारच्या सुनावणीत तीव्र आक्षेप घेत मसीह यांच्याविरोधात गुन्हेगारी प्रकरण नोंद करण्याचा आदेश दिला होता. तसेच, लोकशाहीची हत्या होऊ दिली जाणार नाही, असा इशाराही दिला होता.

मंगळवारी अंतिम निर्णय

मंगळवारी न्यायालयाने संबंधित मतपत्रिकांची तपासणी केली. तसेच व्हिडीओ चित्रणही पाहिले. त्यानंतर न्यायालयाने या आठ मतपत्रिका वैध आहेत, असे मानून पुन्हा मतगणना करण्याचा आदेश दिला, यासाठी नव्या निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्तीही करण्यात आली. न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतर त्वरित दुपारी साडेचार वाजता सर्व मतपत्रिकांची नव्याने गणना करण्यात आली. त्यात आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला 20 मते पडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा उमेदवार महापौरपदी निवडून आला आहे. भारतीय जनता पक्षाचे महापौर सोनकर यांनी दोनच दिवसांपूर्वी महापौर पदाचा राजीनामा दिला होता.

आम आदमी पक्षाचा विजयोत्सव

चंदीगढच्या महापौरपदी आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आल्याने आम आदमी पक्षाने जोरदार आनंदोत्सव साजरा केला. हा लोकशाहीचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया या पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचीही प्रशंसा या पक्षाने केली. अवैध मार्गाने आपला महापौर निवडून आणण्याच्या प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला ही सणसणीत चपराक आहे. त्यांचा डाव उधळला गेला आहे, अशी टिप्पणीही या पक्षाने केली आहे.

अल्पमतातील महापौर ?

आम आदमी पक्षाने महापौर पदाची निवडणूक जिंकली असली तरी सध्याच्या स्थितीनुसार महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत आहे. तथापि, नव्या महापौरांविरोधात सहा महिने अविश्वासाचा प्रस्ताव आणला जाऊ शकत नाही. परिणामी आम आदमी पक्षाचे महापौरपद सहा महिन्यांसाठी टिकू शकते. मात्र, महानगरपालिकेच्या अन्य समित्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे बहुमत होऊ शकते. तसेच, महानगरपालिकेच्या बैठकीत आणण्यात आलेल्या प्रस्तावांवरही भारतीय जनता पक्षाचे बहुमत होऊ शकते. त्यामुळे महापौर आम आदमी पक्षाचा असला तरी, पालिकेत प्रस्ताव संमत करुन घेताना हा पक्ष अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे स्थिती अद्यापही अस्पष्ट आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article