मणिपूर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा
16 तासांत दुसऱ्यांदा घेतली राज्यपालांची भेट : राज्यात पुन्हा हिंसा
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी मागील 16 तासांमध्ये दोनवेळा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेतली आहे. सिंह हे रविवारी दुपारी राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवन येथे पोहोचले. तर शनिवारी रात्री देखील त्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. ही भेट सुमारे 30 मिनिटांपर्यंत चालली होती. त्यापूर्वी विरेन सिंह यांनी मुख्यमंत्री निवासस्थानात सर्व आमदारांशी चर्चा केली होती. विरेन सिंह हे राजीनामा देणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यांनी मागील वर्षी 20 जून रोजी देखील राजीनामा देण्याची तयारी दाखविली होती. परंतु निर्णय बदलला होता.
मणिपूरमध्ये मे 2023 पासून कुकी आणि मैतेई समुदायादरम्यान हिंसा सुरू आहे. तर मागील 7 दिवसांपासून या हिंसेची तीव्रता वाढली आहे. या 7 दिवसांत 8 जणांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्री एन विरेन सिंह हे राजीनामा देणार असल्याच्या चर्चेला विविध कारणांमुळे बळ मिळाले आहे. आजारामुळे रजेवर गेलेल्या मुख्य सचिवांना तत्काळ परत बोलाविण्यात आले आहे. तर दुसरीकडे कुकी उग्रवाद्यांच्या एका संघटनेने राज्यात सार्वजनिक आणीबाणी घोषित केली आहे. या घटनांमुळे मुख्यमंत्री विरेन सिंह हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे.
पहिल्यांदाच ड्रोनद्वारे हल्ला
1 सप्टेंबर रोजी राज्यात पहिल्यांदाच ड्रोन हल्ला झाला. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कोत्रुक गावात उग्रवाद्यांनी पर्वतीय भागातून ड्रोनद्वारे हल्ला केला तसेच गोळीबारही केला आहे. या ड्रोन हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी झाले आहेत.
3 सप्टेंबर रोजी पुन्हा ड्रोन हल्ला
इंफाळ जिल्ह्यातील सेजम चिरांग गावात उग्रवाद्यांनी ड्रोन हल्ले केले आहेत. यात एका महिलेसमवेत 3 जण जखमी झाले आहेत. उग्रवाद्यांनी नागरी वस्तीत ड्रोनद्वारे स्फोटके पाडविली असून ती छत तोडून घरांमध्ये शिरली आणि त्यांचा स्फोट झाला.
माजी मुख्यमंत्र्याच्या घरावर रॉकेट हल्ला
मणिपूरच्या विष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांगमध्ये माजी मुख्यमंत्री मॅरेम्बम कोइरेंग यांच्या घरावर कुकी उग्रवाद्यांनी रॉकेट बॉम्ब फेकला आहे. या हल्ल्यात एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहेत. मॅरेम्बम कोइरेंग हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते.
जिरिबाममध्ये दोन हल्ले, 5 ठार
जिरिबाम येथे जिल्हा मुख्यालयापासूर 7 किलोमीटर अंतरावर उग्रवाद्यांनी एका घरात घुसून झोपलेल्या वृद्धावर गोळ्या झाडल्या आहेत. दुसऱ्या घटनेत कुकी आणि मैतेई लोकांदरम्यान गोळीबार झाला असून यात 4 जणांचा मृत्यू झाला.
सरकारने उचलले मोठे पाऊल
मणिपूरचे पोलीस महानिरीक्षक के. कबीब यांनी राज्यात एक मजबूत ड्रोनविरोधी सिस्टीम तैनात करण्यात आल्याची माहिती दिली आहे. पोलिसांसाठी नव्या यंत्रणा खरेदी केल्या जात असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सैन्याच्या हेलिकॉप्टरद्वारे हवाईगस्त घातली जात आहे. तर संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.