आधार नोंदणी सर्व्हरडाऊनमुळे बंदच
तातडीची दुरुस्ती करून घेणाऱ्यांची गैरसोय : सर्व्हरडाऊनची समस्या सोडविण्याची मागणी
बेळगाव : सर्व्हरडाऊनमुळे आधार नोंदणी पूर्णपणे ठप्प आहे. मागील पाच दिवसांपासून सर्व्हरडाऊनची समस्या जाणवत असल्याने आधार सेवा केंद्रांवर नोंदणी थांबविण्यात आली आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक सेवा केंद्रांपर्यंत येऊन पुन्हा माघारी जात आहेत. ज्यांना तातडीने आधार नोंदणी व दुरुस्ती करावयाची आहे, त्यांची सर्व्हरडाऊनमुळे गैरसोय होत आहे. सध्या सर्वच सरकारी योजना तसेच कामकाजासाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहे. लहान मुलांची आधार नोंदणी करणे, त्याचबरोबर दर दहा वर्षांनी नूतनीकरण, नाव व पत्त्यामधील बदल यासाठी वारंवार आधार केंद्रावर जावे लागते. मागील पाच दिवसांपासून सर्व्हरच्या समस्या जाणवत असल्याने कामकाज थांबविण्यात आले आहे. सर्व्हरच नसल्याने कोणतेच काम होत नसल्याने कर्मचारीही वैतागले आहेत.
काही दिवस थांबण्याची सूचना
अनेकांना तातडीने आधारकार्डमधील दुरुस्ती करावयाची असते. परंतु, सर्व्हरडाऊनमुळे त्यांना अजून काही दिवस थांबण्याची सूचना करण्यात येत आहे. शहरात बेळगाव वन कार्यालयांसह काही निवडक बँका, पोस्ट ऑफिसमध्ये आधार नोंदणी सुरू आहे. ग्रामीण भागात आधार नोंदणीची सोय नसल्याने नागरिकांना शहरात यावे लागते. सर्व्हरडाऊनमुळे नागरिकांना कुटुंबीयांसमवेत आधार नोंदणी केंद्राच्या चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे सर्व्हरडाऊनची समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.