आधार’ पत्रिका
सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, चित्रविचित्र प्रकारांच्या लग्नपत्रिका अशा मोसमात आपल्या घरी येऊन पडत असतात, किंवा जवळचे लोक त्यांच्या घरातील लग्नकार्याच्या पत्रिका आपल्याला स्वत: येऊन देतात. लग्नपत्रिका हा एक मोठा व्यवसाय झाला असून सध्याच्या व्हॉटस्अपच्या काळातही कागदी लग्नपत्रिकांचे महत्व कमी झालेले नाही. काही लग्नपत्रिका इतक्या अनोख्या असतात की कित्येकदा त्या आपल्याला गोंधळात टाकतात किंवा आश्चर्यचकित करतात. लग्नपत्रिकेच्या अशाच एका प्रकाराची ही गोष्ट आहे.
लग्नाच्या पारंपरिक पत्रिकेत सर्वात वरच्या भागात श्रीगजाननाचे चित्र, त्याखाली कुलदैवताचे नाव किंवा आराध्य दैवताचे नाव आणि नंतर इतर आशय असतो. तथापि, एक ‘एक्स’ यूजर डी. के. सरदाना यांनी त्यांना आलेल्या एका लग्नपत्रिकेचे छायाचित्र पोस्ट केले आहे. अशा प्रकारची लग्नपत्रिका पाहून प्रथम ते आश्चर्यचकित झाले. अन्य कोणाच्या तरी नावाचे आधार कार्ड आपल्या घरी चुकून येऊन पडले असावे. ही पोस्टाची चूक असावी, असा त्यांचा समज झाला. त्यामुळे आता पुढे काय करायचे, हे त्यांना समजेना. त्यामुळे ते गोंधळून गेले होते.
तथापि, थोडे लक्षपूर्वक पाहिल्यावर हे आधारकार्ड नसून लग्नपत्रिका आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांचा गोंधळ दूर झाला. त्यांच्याच अत्यंत ओळखीच्या एका मित्राच्या घरातील लग्नाची ती पत्रिका होती. परंतु ती थेट आधारकार्डासारखी होती. आधार कार्डाचे डिझाईन जसे असते तसेच तिचे होते. अशा प्रकारच्या पत्रिका अनेकदा आपल्या पाहण्यात येतात तशा त्या इंटरनेटरवर पोस्टही केल्या जातात. काही दिवसांपूर्वी अॅपल मॅकबुच्या आकाराची पत्रिका पोस्ट करण्यात आली होती. लोकांच्या कल्पनाशक्तीला पारावार नसतो, हेच खरे.