मध्यप्रदेशातून पिस्टल विक्रीसाठी पुण्यात आलेला तरुण जेरबंद
पुणे / वार्ताहर :
मध्यप्रदेशातून पिस्टल विक्रीसाठी पुण्यात आलेल्या तरुणास भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. सतिश गुलाबराव शेरके (वय 23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्हयातील सारंग बिहारी गावचा रहिवासी आहे. कामाच्या निमित्ताने तो पुण्यात ये-जा करत होता.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त घालत असताना अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती कात्रज घाटातील भिलारेवाडी येथे पिस्टल कमरेला लावून थांबलेला आहे. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेत संशयित सतिश शेरके याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 40 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्टल व 600 रुपये किंमतीची तीन काडतुसे आढळून आली. त्यांनंतर पोलिसांनी शेरके याला अटक केली. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.